Hardik Pandya, Gujarat Titans Controversy: IPL 2022 सुरू होण्यापूर्वी अनेक संघांनी त्यांच्या जर्सी लाँच केल्या. प्रथमच आयपीएलमध्ये सामील झालेल्या गुजरात टायटन्सने रविवारी एका कार्यक्रमात त्यांची नवीन जर्सी लाँच केली. त्या वेळी कर्णधार हार्दिक पांड्यासह संघातील इतर स्टार्सही उपस्थित होते. पण सोशल मीडियावर या कार्यक्रमाची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा रंगली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे विक्रम साठ्ये यांनी कार्यक्रमात एक विधान केले. ते विधान अनेकांना रूचलं नाही. विक्रम म्हणाले की, क्रिकेटमुळे कपल्समध्ये तीन महिने भांडणं होत नाहीत, कारण माणूस नेहमी IPLमध्ये व्यस्त असतो. त्यांच्या या विधानाबाबत काही लोकांनी आक्षेप आणि नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं.
नक्की काय म्हणाले विक्रम साठ्ये?
विक्रम साठ्ये म्हणाले, 'क्रिकेट सुरू असलं की कपल्समध्ये वादविवाद होत नाहीत. तीन महिने पुरूष मंडळी क्रिकेट सामने पाहण्यातच व्यस्त असतात. माझी काकू मला सांगते की क्रिकेट सुरू असेल तर त्यांचे पती त्यांच्याशी फारसं काही बोलत नाहीत. घरातील स्त्रियांना सतत सल्ले देत राहण्याची पुरूषांना सवय असते. जर पुरूष क्रिकेट सामने पाहण्यात दंग राहिले तर ते सारखं सारखं आमच्या कामात ढवळाढवळ करणार नाहीत."
ट्विटरवर अनेकांनी या विधानावर आक्षेप घेतला. अनेक युजर्सनी प्रश्न विचारला की एवढ्या मोठ्या कार्यक्रमात कोणी असं कसं बोलू शकतं? काहींनी असंही मत मांडलं की, मुली किंवा स्त्रिया क्रिकेट बघत नाहीत का? केवळ पुरूषमंडळीच क्रिकेट किंवा खेळाचे सामने बघतात किंवा फॉलो करतात असं वातावरण तयार केलं जातंय, असा सूर काही युजर्सच्या कमेंट्समधून दिसून आला.