Hardik Pandya No Look Boundary, IND vs BAN 1st T20: बांगलादेश विरूद्ध कसोटी मालिका जिंकल्यावर टीम इंडियाने टी२० मालिकेचीही विजयी सुरुवात केली. बांगलादेशच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १२७ धावा केल्या. अर्शदीप सिंगचा भेदक मारा आणि त्याला इतर गोलंदाजांची मिळालेली साथ यामुळे बांगलादेशच्या फलंदाजांना फारशी मोठी मजल मारता आली नाही. त्यानंतर भारतीय संघाकडून सलामीवीर संजू सॅमसन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव या दोघांनी दमदार खेळी केली. त्यासोबतच उपकर्णधार हार्दिक पांड्याने आपला धडाकेबाज फॉर्म परत दाखवून दिला. संघाकडून सर्वाधिक धावा करत नाबाद राहून त्याने संघाला विजय मिळवून दिला. हार्दिकने किपरच्या डोक्यावरून मारलेल्या फटक्याची चांगलीच चर्चा रंगली.
बांगलादेशने दिलेल्या १२८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही नवी सलामीवीरांची जोडी मैदानात उतरली. अभिषेक शर्मा १६ धावांवर बाद झाला. संजू सॅमसनने ६ चौकारांसह २९ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने २ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने २९ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर नवख्या नितीश कुमार रेड्डीसोबत हार्दिक पांड्याने सामन्याचा ताबा घेतला. हार्दिकने १२व्या षटकात अप्रतिम शॉट खेळला. तस्किन अहमदने षटकातील तिसरा चेंडू टाकला. हार्दिक पिचवर सेट झालेला असल्याने त्याने चेंडूकडे न बघताच किपरच्या डोक्यावरून पाठीमागे चौकार मारला. या शॉटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हार्दिक पांड्याने या सामन्यात केवळ १६ चेंडूंचा सामना केला आणि २४४ च्या स्ट्राइक रेटने नाबाद ३९ धावा केल्या. हार्दिक पांड्याने या खेळीत ५ चौकार आणि २ षटकार मारले. त्यानेच संघाला षटकार ठोकत विजय मिळवून दिला.
त्याआधी भारतीय गोलंदाजांनीही कमाल करून दाखवली. बांगलादेशचे दोनही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर कर्णधार नजमुल शान्तो आणि तौहिद हृदय यांनी डाव सावरायचा प्रयत्न केला. नजमुल २७ धावांवर बाद झाला. झटपट विकेट गमावल्यामुळे बांगलादेशची अवस्था ६ बाद ७५ होती. खालच्या फळीत मेहदी हसन मिराजने ३५ धावांची संयमी खेळी करत संघाला १२७ धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताकडून अर्शदीपने १४ धावांत ३ बळी, वरूण चक्रवर्तीने ३१ धावांत ३ तर हार्दिक पांड्या, मयंक यादव आणि वॉशिंग्टन सुंदरने १-१ बळी टिपला.