Hardik Pandya Suryakumar Yadav, Team India IND vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा संघ सोमवारी रवाना झाला. भारतीय संघ २७ जुलैपासून टी२० मालिका खेळणार आहे. २७, २८ आणि ३० जुलै अशा तीन दिवशी हे सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी भारताकडून सूर्यकुमार यादव याला कर्णधार करण्यात आले आहे. रोहित शर्माने टी२०तून निवृत्ती घेतल्यानंतर भारताचा नवा कर्णधार कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. हार्दिक पांड्या हा आधी संघाचा उपकर्णधार होता, त्यामुळे त्याला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली जाईल असे वाटत होते. पण संघ व्यवस्थापनाने सूर्यावर विश्वास दाखवला. संघ जाहीर झाल्यानंतर सूर्या आणि हार्दिक यांच्यात कर्णधारपदावरून काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा होत्या. BCCI ने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये याबाबतचे उत्तर मिळाले.
भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनाखाली काल टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली. यावेळी सर्व खेळाडू एकत्र आले. कर्णधारपद हार्दिकला मिळाले नसल्याने सूर्या-हार्दिक समोरासमोर आल्यावर दोघांच्यातील नाते कसे असेल, यावर साऱ्यांचीच नजर होती. सोशल मीडियावरही याबाबत वातावरण तयार झाले होते. पण जे पाहायला मिळाले ते यापेक्षा वेगळे होते. हार्दिक आणि सूर्या समोर आल्यावर दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. मिठी मारून त्यांनी खूप छान गप्पा मारल्याचे व्हिडीओमध्ये दिसून आले. पाहा VIDEO-
दरम्यान, आजच श्रीलंकेने टी२० मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला. या संघात चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, महिश तिक्षणा, चामिंदू विक्रमसिंगे, मथिशा पाथिराना, नुवान थुसारा, दुनिथ वेल्लालागे, दुश्मंता चामिरा, बिनुरा फर्नांडो या १६ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.