Hardik Pandya IPL 2022 : गुजरात टायटन्सने पदार्पणात इंडियन प्रीमिअर लीग 2022च्या फायनलमध्ये प्रवेश करण्याचा पराक्रम केला. क्वालिफायर 1 सामन्यात गुजरातने मंगळवारी राजस्थान रॉयल्सवर 7 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. डेव्हिड मिलर, हार्दिक पांड्या व राशीद खान हे तिघं या विजयाचे शिल्पकार ठरले. शुबमन गिल व मॅथ्यू वेड यांनीही हातभार लावला. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत हार्दिक दुखापतीमुळे मैदानाबाहेर होता. त्यामुळे त्याची फिटनेस हा चिंतेचा विषय बनलाच होता, परंतु आयपीएल 2022मध्ये त्याने स्वतःची तंदुरुस्ती सिद्ध केलीच, शिवाय नेतृत्वकौशल्याची दखल घेण्यास सर्वांना भाग पाडले.
गुजरात टायटन्सने यंदाच्या पर्वात तिसऱ्यांदा १८०+ धावांचा यशस्वी पाठलाग केला. यापूर्वी किंग्स इलेव्हन पंजाब ( २०१४), दिल्ली डेअरडेव्हिल्स ( २०१७), चेन्नई सुपर किंग्स ( २०१८), कोलकाता नाईट रायडर्स ( २०१९) व राजस्थान रॉयल्स ( २०२०) यांनी अशी कामगिरी केली होती. प्ले ऑफमध्ये अखेरच्या षटकांत सर्वाधिक धावा करण्याचा मान गुजरातने पटकावला. त्यांनी १६ धावा हव्या असताना तीन षटकार खेचले. याआधी चेन्नई सुपर किंग्सने मागील पर्वात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अखेरच्या षटकात विजयासाठी हव्या असलेल्या १३ धावा केल्या होत्या.
नव्या फ्रँचायझीसह हार्दिकने स्वतःला सिद्ध केले असले तरी त्याच्या तंदुरुस्ती व क्षमतेवर अजूनही टीका केली जातेय. त्यांना हार्दिकने सडेतोड उत्तर दिले. 28 वर्षी अष्टपैलू खेळाडू म्हणाला, लोगो का तो काम है केहना, क्या करू सर?. हार्दिक पांड्या के साथ थोडा न्यूज बिकता है!, मुझे कोई प्रॉब्लेम नही है!, हंसी के साथ निकाल देता हॅूं! ( लोकांचं कामच ते आहे, मी काय करू सर?; हार्दिक पांड्याचं नाव घेतलं की न्यूज पण विकली जाते. मला काहीच समस्या नाही. मी हसून सोडून देतो.)''
हार्दिकने यावेळी प्ले ऑफ दी मॅच ठरलेल्या डेव्हिड मिलरचेही कौतुक केले. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये पहिल्या फेरीत अऩसोल्ड राहिलेल्या मिलरला गुजरात टायटन्सने 3 कोटींत आपल्या ताफ्यात घेतले.''ज्याप्रकारे त्याने विजय मिळवून दिला, मला त्याचा अभिमान वाटतो. तो खूप चांगला खेळाडू आहे. त्याच्यासोबत चांगलं व्हावं हे मला नेहमी वाटते. डेव्हिड मिलर संपला असे अनेकांना वाटू लागले होते, परंतु माझ्यासाठी तो नेहमीच मॅच विनर खेळाडू आहे आणि त्यामुळे ऑक्शनमध्ये त्याला आम्ही घेतले. आज जसा तो खेळला, अशाच खेळीची त्याच्याकडून अपेक्षा आहे,''असे हार्दिक म्हणाला.