Hardik Pandya Mumbai Indians IPL 2024: फॉर्मशी झुंजणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचे आव्हान असणार आहे. बंगळुरू संघाने पाचपैकी चार, तर मुंबईने चारपैकी तीन सामने गमावले आहेत. मुंबईने पहिले तीन सामने गमावल्यानंतर चौथ्या सामन्यात दिल्लीचा २९ धावांनी पराभव केला. त्यामुळे मुंबईचा संघ विजयी लय कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल यात वाद नाही. पण तसे असेल तरी मुंबई-बंगळुरू यांच्यातील मागील पाचपैकी चार सामन्यांत बंगळुरुने बाजी मारली आहे. त्यामुळे आजचा सामनाही हार्दिकसाठी कसोटी असणार आहे. याच दरम्यान हार्दिकबद्दल मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने एक मोठे विधान केले आहे.
मुंबईचा धडाकेबाज खेळाडू टीम डेव्हिड म्हणाला, "हार्दिक हळूहळू चांगल्या लयीत परतला आहे. तो मागच्या वेळी मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात आऊट झालाय टी२० क्रिकेटमध्ये ही गोष्ट नवी नाही. मी आधीच म्हटल्याप्रमाणे हार्दिकने शेवटच्या सामन्यात मधल्या फळीत आपली भूमिका चोख बजावली. तो ड्रेसिंग रूमपासून ते मैदानावर सर्व अतिशय मनमोकळा वागतो. शेवटच्या ओव्हर्समध्ये मोकळेपणाने खेळण्याची संधी तो आम्हाला देतो. हार्दिक ज्याप्रकारे संघासाठी आता खेळत आहे, तीच संघाची गरज आहे. आमच्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक हा संघाचा 'गोंद' आहे जो ११ जणांच्या संपूर्ण संघाला जोडून ठेवतो."
"आम्ही संघातील खेळाडूंबद्दल चर्चा करत असतो. हार्दिकच्या फलंदाजीची गती संथ झाली असल्याचे आम्हाला दिसत आहे. त्यावर आम्ही निश्चितच चर्चा केली आहे. तो त्याच्या पद्धतीने यातून मार्ग काढेल याची आम्हाला खात्री आहे. हार्दिक आमच्या संघात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शेवटच्या सामन्यात (दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध) आम्ही मधल्या षटकांमध्ये संघर्ष करत होतो, पण हार्दिकने आमच्यासाठी शानदार खेळी खेळली आणि रोमॅरियो (शेफर्ड) आणि मी शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करू शकलो", असे डेव्हिड म्हणाला.