नवी दिल्ली : यूएईच्या धरतीवर आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) चा थरार रंगला आहे. या स्पर्धेचे प्रबळ दावेदार आणि कट्टर प्रतिस्पर्धी आपल्या पहिल्या सामन्यात २८ ऑगस्ट रोजी आमनेसामने आले होते. चुरशीच्या या लढतीत अखेर भारतीय संघाने विजय मिळवून पाकिस्तानला धूळ चारली. भारताकडून हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) शानदार खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात हार्दिकने प्रथम गोलंदाजी करताना महत्त्वाचे ३ बळी पटकावले तर दुसऱ्या डावाता १७ चेंडूंत नाबाद ३३ धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला.
पांड्याचे 'हार्दिक' अभिनंदनदरम्यान, हार्दिक पांड्याने केलेल्या अष्टपैलू खेळीचा त्याला चांगलाच फायदा झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकत्याच जारी केलेल्या अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत हार्दिकने मोठी झेप घेतली आहे. हार्दिक पांड्याने पाकिस्तानविरूद्धच्या चुरशीच्या लढतीत वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला. आयसीसीने जाहीर केलेल्या अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत त्याने आठ स्थानांनी झेप घेतली असून पाचव्या स्थानावर मजल मारली आहे. विशेष बाब म्हणजे पाचवे स्थान हे त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
हार्ड हिटिंग पांड्याने पाकिस्तानविरूद्ध २५ धावा देऊन ३ बळी पटकावले होते. तसेच केवळ १७ चेंडूंत ३३ धावा ठोकून भारताला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे आगामी ऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या टी-२० विश्वचषकामध्ये हार्दिक पांड्याची खेळी भारतीय संघासाठी महत्त्वाची असणार आहे. भारताने पाकिस्तानला पराभूत करून आशिया चषकात विजयी सलामी दिली आहे. आज भारत आणि हॉंगकॉंग यांच्यात सामना होणार असून रोहित सेना सुपर-४ मधील स्थान निश्चित करण्यासाठी मैदानात उतरेल.