मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व लोकेश राहुल हे त्यांच्या कामगिरीमुळे जेवढे चर्चेत आले नसतील त्यापेक्षा अधिक चर्चा ही कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील विधानामुळे होत आहे. महिलांबद्दल अपमानास्पद विधान करणाऱ्या या खेळाडूंवर बीसीसीआयने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी यावे लागले आणि न्यूझीलंड दौऱ्यालाही मुकावे लागले. या प्रकरणावर भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला विचारले असता त्याने टीकाकारांना 'ओव्हररिअॅक्ट' (अवाजवी प्रतिक्रिया ) होऊ नका असा सल्ला दिला आहे.
द्रविड हा भारताच्या 19 वर्षांखालील आणि A संघाचा प्रशिक्षक आहे. तो म्हणाला,''क्रिकेटमध्ये हे पहिल्यांदाच घडले आहे, असे नाही. याआधीही खेळाडूंकडून अशा चूका झाल्या आहेत. त्या पुढे होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. युवा खेळाडूंना त्यादृष्टीने मार्गदर्शन करायला हवे, परंतु आता या प्रकरणावर अवाजवी प्रतिक्रिया देणे थांबवा.''
''हे खेळाडू वेगवेगळ्या संघातून येतात आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे. या वयातच त्यांना मार्गदर्शन देण्याची गरज आहे. व्यवस्थेशी थट्टा करू नये, हे त्यांना सांगायला हवं. मी या गोष्टी कर्नाटकातील वरिष्ठ खेळाडू, पालक आणि प्रशिक्षकांकडून शिकलो. ते माझे आदर्श होते. मला हे कुणी बाजूला बसून शिकवलं नाही. मी त्यांना पाहून शिकलो,'' असे द्रविड म्हणाला.
तो पुढे म्हणाला,''भूतकाळातही अशा घटना घडल्या आहेत आणि लोकं ते विसरले आहेत. आता अशा घटना झटकन पसरतात. त्या टाळण्यासाठी खेळाडूंना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. भारतीय क्रिकेटपटू म्हणून त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी.'' अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, मोहिंदर अमरनाथ, व्ही. व्ही. एस लक्ष्मण या माजी खेळाडूंसह बीसीसीआयचे अधिकारी रत्नाकर शेट्टी यांनीही या प्रकरणावर आपापली मतं मांडली होती.