राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य खेळाडूंनी द्यावं यासाठी बीसीसीआयने कठोर पाऊलं उचलली. त्यामुळेच त्यांनी इशान किशन व श्रेयस अय्यर यांना वार्षिक करारातून वगळले, परंतु त्याचवेळी देशांतर्गत क्रिकेटकडे पूर्णपणे पाठ फिरवलेल्या हार्दिक पांड्याला करार दिले गेले. त्यामुळे भारताचा व मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू प्रविण कुमार ( Praveen Kumar) याने हार्दिकवर पुन्हा एकदा टीका केली. तो काय चंद्रावरून आला आहे का, असा सवाल प्रविणने केला.
आयपीएल २०१४ मध्ये झहीर खानची रिप्लेसमेंट म्हणून MI च्या ताफ्यात दाखल झालेला प्रविण म्हणाला, हार्दिक पांड्या चंद्रावरून उतरला आहे का? त्यालाही देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळायलाच लागेल. त्याच्यासाठी वेगळे नियम का आहेत? बीसीसीआयने त्याला धमकावले पाहिजे. तुम्ही फक्त देशांतर्गत ट्वेंटी-२० स्पर्धा का खेळाल? तिन्ही फॉरमॅट खेळा. तुम्ही ६०-७० कसोटी सामने खेळले आहेत, की तुम्ही फक्त ट्वेंटी-२० खेळता. देशाला तुमची गरज आहे.
प्रविणने प्रथमच हार्दिकवर टीका केलेली नाही. यापूर्वीही त्याने मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. "आयपीएलच्या दोन महिन्यांपूर्वी तुम्ही जखमी होतात, तुम्ही देशासाठी खेळत नाही, तुम्ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये तुमच्या राज्यासाठी खेळत नाही आणि थेट आयपीएलमध्ये खेळता. या गोष्टी चुकीच्या आहेत. पैसे कमवा, त्यात काही चुकीचे नाही. पण तुम्हाला राज्य आणि देशासाठी खेळायचे आहे. आता लोकं फक्त आयपीएललाच महत्त्व देत आहेत", असे प्रवीण म्हणाला होता.
श्रेयस अय्यर व इशान किशन यांना वार्षिक करारातून वगळल्यानंतर वाद निर्माण झाला होता. पण, हार्दिकला करारात ठेवले गेले. तो रणजी करंडक स्पर्धेत खेळत नाही, फक्त सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० व विजय हजारे ट्रॉफीत त्याने सहभाग घेतला होता. यावर बीसीसीआयने कारणही सांगितले की, तो रेड बॉल क्रिकेटसाठी फिट नाही आणि त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट नसताना अन्य देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळण्याचे आश्वासन दिले आहे.