Hardik Pandya, IPL 2022 GT vs DC Live: नव्या दमाचा कर्णधार हार्दिक पांड्याच्यागुजरात टायटन्सने दिल्लीच्या संघाला १४ धावांनी पराभूत केलं. शुबमन गिलच्या ८४ धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरातने १७१ धावांची मजल मारली होती. ते आव्हान दिल्लीला पेललं नाही. दिल्लीकडून रिषभ पंतने कर्णधारपदाच्या जबाबदारीने फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, पण तो ४३ धावांवर बाद झाला. त्याच्या व्यतिरक्त कोणत्याही फलंदाजाने चमक दाखवली नसल्याने दिल्लीचा पराभव झाला.
१७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या डावाची सुरूवात खराब झाली. पृथ्वी शॉ (१०), टीम सिफर्ट (३), मनदीप सिंग (१८) हे झटपट बाद झाले. पंतने ललित यादवच्या साथीने काही काळ फलंदाजी केली. पण ललित यादव (२५) धावचीत झाला. त्यानंतर रिषभ पंतकडून अपेक्षा होत्या. त्याने ७ चौकारांसह ४३ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ अक्षर पटेल (८), शार्दूल ठाकूर (२) आणि रॉवमन पॉवेल (२०) हे देखील बाद झाले. त्यामुळे दिल्लीचा धावांनी पराभव झाला.
तत्पूर्वी फलंदाजी करताना गुजरातला पहिला धक्का लवकर बसला. मॅथ्यू वेड एक धाव काढून बाद झाला. विजय शंकरदेखील १३ धावांत माघारी परतला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि शुबमन गिल यांच्यात ६५ धावांची भागीदारी झाली. हार्दिक चांगली सुरूवात मिळाल्यानंतर ३१ धावांवर माघारी परतला. पण शुबमन गिलने शानदार अर्धशतक झळकावलं. त्याने ६ चौकार आणि ४ षटकार खेचत ४६ चेंडूत ८४ धावा केल्या. त्याशिवाय, राहुल तेवातिया आणि डेव्हिड मिलर जोडीनेही शेवटच्या षटकांत फटकेबाजी करत संघाला १७१ पर्यंत मजल मारून दिली.