Gujarat Titans Vice Captain: गुजरात टायटन्सचा संघ सोमवारी IPL 2022 मध्ये पहिला सामना खेळणार आहे. त्यांचा सामना हंगामातील दुसरा नवा संघ लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्याविरुद्ध होणार आहे. या सामन्याच्या माध्यमातून Hardik Pandya आपल्या कर्णधारपदाच्या नव्या इनिंगच्या पदार्पणासाठी सज्ज आहे. याच दरम्यान गुजरात संघाने आपल्या उपकर्णधाराचीही घोषणा केली. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांनी उपकर्णधाराचं नाव जाहीर केलं.
गुजरात संघाच्या पहिल्या सामन्याआधी फ्रेंचायझीने इन्स्टाग्रामवर आपल्या खास खेळाडूवर मोठी जबाबदारी सोपवली. गुजरात टायटन्सने अफगाणिस्तानचा अनुभवी लेग स्पिनर राशिद खान (Rashid Khan) याला संघाचं उपकर्णधार घोषित केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर काही सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचे नेतृत्व करणाऱ्या रशीदला नेतृत्वाची भूमिका नवीन नाही. त्याला टायटन्सने मेगा लिलावापूर्वीच १५ कोटींना करारबद्ध केलं. त्यामुळे या हंगामात हार्दिक पांड्याला साथ देण्यासाठी आता राशिद नव्या जबाबदारीसह सज्ज झाला आहे.
गुजरात टायटन्सने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर अधिकृत घोषणा केली आणि हार्दिक आणि रशीद यांचा एकत्र हसतानाचा एक फोटो पोस्ट केला. “आणखी एक महत्त्वाचं, #SeasonOfFirst मध्ये राशिद भाई आमचे उपकर्णधार बनले आहेत”, असं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले. राशिद खान हार्दिक पांड्यासोबत खेळण्यासाठी आणि नवीन फ्रेंचायझीसाठी उत्सुक आहे. या दोघांनी आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्याही संघांचे नेतृत्व केलेले नाही. तसेच, दोघेही कधीच एकत्र खेळलेले नाहीत. त्यामुळे हे दोन लीडर आपल्या संघाला कशाप्रकारे पुढे नेतात, त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.