Hardik Pandya Mumbai Indians Playing XI changes, IPL 2024: मुंबई इंडियन्सचा संघ सध्या मैदानात आणि मैदानाबाहेर दोन्हीकडे वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करत आहे. हंगामाच्या लिलावाआधीच मुंबईने आपला नियमित कर्णधार बदलला आणि त्याच्या जागी गुजरात टायटन्सकडून विकत घेतलेल्या हार्दिक पांड्याला संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सला सलग दोन वर्षे फायनलमध्ये धडक मारून देत होता. पण मुंबई इंडियन्ससाठी त्याच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात चांगली झाली नाही. मुंबईला पहिल्या सामन्यात गुजरातविरूद्ध अटीतटीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर सनरायजर्स संघाने तर मुंबईच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवत २७८ धावा कुटल्या. तो सामनाही मुंबईने गमावला. त्यामुळे आजच्या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या एक महत्त्वाचा बदल करणार असून एका खेळाडूचा पत्ता कट करणार असल्याचे बोलले जात आहे.
फलंदाजी मुंबईची जमेची बाजू
सध्याचा मुंबईचा संघ पाहता, सलामीचे दोन खेळाडू रोहित शर्मा आणि इशान किशन हे दमदार फॉर्मात आहेत. त्यांची संघातील जागा पक्की आहे. नमन धीर या भारतीय खेळाडूला तिसऱ्या क्रमांकावर पाठवणे मुंबईसाठी आतापर्यंत फायदेशीर ठरले आहे. त्यानंतर डेवाल्ड ब्रेव्हिस आणि तिलक वर्मा हे दोन नव्या दमाचे खेळाडू मुंबईला मोठी धावसंख्या उभी करण्यास मदत करतात. तसेच हार्दिक पांड्या, टीम डेव्हिडदेखील फटकेबाजी करू शकतात हे साऱ्यांनीच पाहिले आहे.
हा खेळाडू होऊ शकतो संघाबाहेर
मुंबई इंडियन्सच्या संघात सध्या गोलंदाजीत काही प्रयोग केले जात आहेत. गेल्या सामन्यात नव्या दमाच्या क्वेना मफाका याला संधी देण्यात आली होती. त्याची कामगिरी फारशी चांगली झालेली नसली तर हार्दिकने त्याचे कौतुक केले होते. त्यामुळे त्याला आणखी काही सामन्यात संधी दिली जाईल. मात्र त्याच्या जागी फलंदाजीत 'सब्स्टीट्यूट' म्हणून रोमारिओ शेपर्डला संधी देण्यात आली होती. त्याबदल्यात मोहम्मद नबी सारख्या अनुभवी खेळाडू संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
गोलंदाजीत फार बदल अपेक्षित नाहीत
क्वेना मफाला याला संघात कायम ठेवल्यानंतर इतर गोलंदाजांनाही संधी दिली जाईल असे चित्र आहे. अनुभवी फिरकीपटू पियुष चावला चांगली कामगिरी करत आहे. जसप्रीत बुमराह दमदार गोलंदाजी करत आहे. तसेच गेराल्ड कोइत्झेदेखील वेगवान मारा करण्यात प्रभावी ठरताना दिसतोय. त्यामुळे एका बदलासह मुंबई इंडियन्स मैदानात उतरेल असे बोलले जात आहे.
मुंबई इंडियन्सचा संभाव्य संघ-रोहित शर्मा, इशान किशन, नमन धीर, डेवाल्ड ब्रेव्हिस, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी / क्वेना मफाका, गेराल्ड कोइत्झे, पियुष चावला, जसप्रीत बुमराह
Web Title: Hardik Pandya led Mumbai Indians make changes in probable playing xi mohammad nabi kwena mphaka
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.