IND vs IRE T20 Series: टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिका खेळत आहे. यानंतर भारताला हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयर्लंडचा दौरा करायचा आहे. तिथे फक्त दोन टी२० सामने खेळले जाणार आहेत. या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली असून त्यात राहुल त्रिपाठीच्या नावाचाही समावेश आहे. मात्र राहुल त्रिपाठीचे ( नाव संघाRahul Tripathi) नाव समाविष्ट असले तरी आयर्लंड दौऱ्यात त्याला 'प्लेइंग ११' मध्ये संधी मिळणं कठीण असल्याचे मत माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने व्यक्त केले आहे.
राहुल त्रिपाठी 'प्लेइंग ११' मध्ये खेळण्याबाबत प्रश्न विचारला असता आकाश चोप्रा म्हणाला, "संघात आधीच ९ फलंदाज आहे. अशा परिस्थितीत राहुल त्रिपाठीला संधी मिळणं अवघड आहे. दीपक हुडाला दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेत संधी मिळालेली नाही. त्याला आयर्लंड दौऱ्यावर संधी मिळू शकते. त्यामुळे राहुलला संधी मिळणे कठीण आहे. या दौऱ्यावर संजू सॅमसनला संधी मिळणेही कठीण आहे. कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत जे खेळाडू बेंचवर बसले पण खेळले नाहीत अशांना प्रथम संधी दिली जाईल अशी अपेक्षा आहे. कारण प्रत्येकालाच संधी मिळण्याचा अधिकार आहे."
३१ वर्षीय राहुल त्रिपाठी IPLमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. या वर्षी त्याने दमदार फलंदाजी केली. IPL 2022 मध्ये राहुल त्रिपाठीने १४ सामन्यात ४१३ धावा केल्या. आफ्रिका मालिकेसाठी त्याचे नाव आले नाही, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले होते पण आयर्लंड दौऱ्यासाठी त्याचा विचार केला गेला.
आयर्लंड दौरा ठरणार ऐतिहासिक!
यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये जानेवारीपासून आतापर्यंत ४ खेळाडूंनी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. हार्दिक पांड्या हा यंदाच्या वर्षात संघाचे नेतृत्व करणारा पाचवा कर्णधार असेल. असा योगायोग ६३ वर्षांपूर्वी घडला होता. ६३ वर्षांपूर्वी म्हणजे १९५९ मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व ५ खेळाडूंनी केले होते. हेमू अधिकारी, दत्ता गायकवाड, विनू मांकड, गुलाबभाई रामचंद आणि पंकज रॉय या पाच कर्णधारांनी एकाच वर्षी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर या वर्षी रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या हे पाच जण संघाचे कर्णधार झाले आहेत.
आयर्लंड दौऱ्यासाठी भारताचा संघ- हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक