Hardik Pandya Team India, IND vs SL: पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने अतिशय निसटता विजय मिळवला. श्रीलंकेने भारताला मुंबईत काँटे की टक्कर दिली. वानखेडेच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने अवघ्या २ धावांनी विजय मिळवला. आता गुरूवारी म्हणजेच उद्या पुण्यात दुसरा सामना रंगणार आहे. टीम इंडिया सध्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे आणि हे पाहता संघाची कामगिरी चांगली झाली असली तरी पुढच्या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या संघात काही बदल करू शकतो असे बोलले जात आहे. पाहूया काय असू शकेल बदल...
पहिल्या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी आणि गोलंदाजी फारसा प्रभाव पाडू शकली नाही. यावरून असे दिसते की संघात बदल होऊ शकतो. संघ व्यवस्थापन खेळाडूंना सतत संधी देण्याचे बोलतात. अशा स्थितीत संघात ३ बदल होण्याची शक्यता आहे.
संजू सॅमसन टीम इंडियामध्ये सतत नसल्याने त्याला संधी न देत असल्याचे अनेक आरोप झाले होते, मात्र पहिल्या सामन्यात तो संधीचा फायदा घेऊ शकला नाही. तो अवघ्या ५ धावांवर बाद झाला. असे असूनही त्याला संघातून वगळण्याच येईल असे नाही तर पहिल्या सामन्यातील दुखापतीने परिस्थिती बदलली. मिळालेल्या वृत्तानुसार, गुडघ्याच्या दुखापतीमुळे सॅमसन या सामन्यात खेळू शकणार नाही. बुधवारी तो संघासह पुण्याला न जाता मुंबईतच थांबला होता.
राहुल त्रिपाठी पदार्पण करणार का?
संघात संजूच्या जागी कोण येणार हा प्रश्न आहे. ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी या दोन फलंदाजांचे पर्याय संघाजवळ आहेत. मात्र दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर राहुल त्रिपाठीला पदार्पणाची संधी मिळेल असे दिसते. ऋतुराज आणि त्रिपाठी हे आघाडीच्या फळीतील फलंदाज असले तरी राहुलला मधल्या फळीत खेळण्याचाही अनुभव आहे. त्यामुळे सॅमसनच्या जागी तो सर्वोत्तम पर्याय असल्याचे दिसते.
गोलंदाजीत २ बदलांची शक्यता
गोलंदाजीत दोन खेळाडू आपले स्थान गमावू शकतात. लेग-स्पिनर युझवेंद्र चहल आणि मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेल दोघांनाही संघातून बाहेर केले जाऊ शकते. दोघेही गेल्या सामन्यातच नव्हे तर अलीकडच्या काळात खूप महागडे ठरले आहेत. चहलने २ षटकात २६ धावा दिल्याने त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर संघात येऊ शकतो. त्याचवेळी आजारपणामुळे पहिल्या सामन्यात खेळू न शकलेला अर्शदीप सिंग पुनरागमन करू शकतो. अर्शदीपच्या जागी शिवम मावीला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने ४ बळी घेत संधीचे सोनं केलं. अशा परिस्थितीत हर्षल पटेलने ४ षटकांत ४१ धावा दिल्याने त्यालाच संघाबाहेर काढले जाऊ शकते.