India vs New Zealand T20 Records: भारतीय संघाने घरच्या मैदानावर झालेल्या न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेत धमाकेदार विजय मिळवला. भारतीय संघाने पाहुण्यांना व्हाईटवॉश देत, (IND vs NZ) मालिका ३-० ने जिंकली. न्यूझीलंड विरूद्धची आगामी मालिका आजपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात स्थानिक स्पर्धा गाजवणाऱ्या पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) चा समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना पुन्हा एकदा टी२० संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे आणि हार्दिक पांड्याकडे टी२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून सूर्यकुमार यादव संघाचा उपकर्णधार असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रांची येथे होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाला रांचीमध्येही विजयाने सुरुवात करायची आहे. मात्र, न्यूझीलंडच्या संघाला हरवणं तितकं सोपं नाही. त्यांचा संघही पलटवार करू शकतो. जाणून घेऊया दोन्ही संघांचे टी२० सामन्यांचे ४ महत्त्वपूर्ण रेकॉर्ड्स.
भारत-न्यूझीलंड टी२० क्रिकेटमधील चार महत्त्वाच्या बाबी...
- २००७ मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी२० सामना खेळला गेला होता. तेव्हापासून या दोघांमध्ये २२ सामने खेळले गेले. त्यापैकी १२ सामने भारताने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडला ९ सामने जिंकण्यात यश आले. या २२ पैकी केवळ एक सामना अनिर्णित राहिला.
- गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होता. ते दोघांमध्ये तीन टी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली. या मालिकेतील पहिला आणि शेवटचा सामना पावसामुळे खेळला गेला नाही. पण दुसऱ्या सामन्यात भारताने बाजी मारली आणि ही मालिका १-० अशी खिशात घातली.
- न्यूझीलंडने २०२१ मध्ये भारतात शेवटची टी२० मालिका खेळली होती. येथेही न्यूझीलंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारताने त्यांना क्लीन स्वीप करत ३-० असा मालिका विजय मिळवला होता.
- आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, ही दुसरी वेळ आहे जेव्हा भारतीय संघ रांचीमध्ये न्यूझीलंड विरुद्ध टी२० सामना खेळणार आहे. शेवटच्या वेळी हे दोन्ही संघ येथे आमने-सामने आले होते, तेव्हा भारताने सात विकेट्सने टी२० सामना जिंकला होता.
न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यासाठी भारताचा संघ- हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा ( यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उम्रान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार