Hardik Pandya in IPL 2022: भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खेळत आहे. तीन सामन्यांची कसोटी मालिका १-१ असी बरोबरीत असून उद्या निर्णायक सामन्याला सुरूवात होणार आहे. या मालिकेनंतर तीन सामन्यांची वन डे मालिकादेखील खेळली जाणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात IPL च्या आगामी हंगामासाठी मेगालिलाव आयोजित होणार असल्याची शक्यता आहे. IPL 2022मध्ये आठ ऐवजी दहा संघ खेळणार आहेत. आठ जुन्या संघांशिवाय लखनऊ आणि अहमदाबाद असे दोन नवे संघ स्पर्धेत उतरणार आहेत. या संघांनाही बडे खेळाडू ताफ्यात घेता यावेत म्हणून काही नियमांमुळे IPL च्या इतर संघांनी आपले महत्त्वाचे ४ खेळाडू संघात ठेवले आणि इतर खेळाडूंना करारमुक्त केलं. मुंबई इंडियन्सनेही त्यांचा स्टार फलंदाज हार्दिक पांड्याला संघातून मुक्त केलं. मेगालिलावात त्याला मुंबईचा संघ परत विकत घेईल असं बोललं जात असतानाच आता हार्दिक मुंबई नव्हे तर एका वेगळ्याच संघाकडून खेळणार असल्याची चर्चा आहे.
हार्दिक पांड्या हा नव्याने स्पर्धेत उतरणाऱ्या अहमदाबाद संघात समाविष्ट होणार असल्याची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे. अहमदाबाद संघाचा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरला संघात संधी मिळणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. पण आता हार्दिक पांड्याला अहमदाबादचा संघ विकत घेणार असून त्याला थेट कर्णधारपद दिलं जाणार असल्याची काही ट्विट्स सोशल मीडियावर दिसू लागली आहेत.
--
--
--
--
--
दरम्यान, हार्दिक पांड्या किंवा अहमदाबाद संघ व्यवस्थापन दोन्ही पैकी कोणीही याबद्दल अधिकृतरित्या कोणतीही माहिती पुरवलेली नाही. पण हार्दिक पांड्या गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या दुखापतीमुळे त्याला गोलंदाजीही फारशी वेगाने करता येत नव्हती हे अनेकांनी बोलून दाखवलं आहे. अशा परिस्थितीत हार्दिक आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करत आहे. IPLमधून अनेक अष्टपैलू खेळाडूंना टीम इंडियात संधी मिळाली आहे. अशा परिस्थितीत आपलं स्थान पुन्हा मिळवण्यासाठी IPL 2022 मध्ये हार्दिकला आपली छाप पाडावीच लागणार आहे. अशा वेळी हार्दिक नक्की कोणत्या संघात जातो हे पाहणं खरंच औत्सुक्याचं ठरणार आहे.
Web Title: Hardik Pandya may be the captain of Ahmedabad based IPL franchise Twitter Reacts
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.