भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या क्रिकेटपासून दूर आहे. दुखापतीमुळे पांड्या विश्रांती घेत असून आता तो थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. अलीकडेच हार्दिक पांड्यावर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पांड्या नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दिसला. हे दोघेही गांधीनगर लोकसभा प्रीमिअर लीगच्या उद्घाटनासाठी एकत्र आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही पांड्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अमित शाह आणि हार्दिक पांड्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये क्रिकेट लीगचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अष्टपैलू हार्दिक उपस्थित होता. पांड्याने यावेळी लीगमधील खेळाडूंची देखील भेट घेतली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह हेही उपस्थित होते.
दरम्यान, हार्दिक पांड्या २०२३ च्या वन डे विश्वचषकापासून क्रिकेटच्या मैदानाबाहेर आहे. विश्वचषकाच्या स्पर्धेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. भारत आणि बांगलादेश यांच्यात पुण्यात झालेल्या सामन्यात पांड्याला दुखापत झाली होती. पांड्या सोशल मीडियावर फिटनेसबाबतचे अपडेट्स अनेकदा शेअर करत असतो. पांड्या मैदानात कधी परतणार याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हार्दिक पांड्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत ८६ वन डे, ११ कसोटी सामने खेळले आहेत. तर ९२ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. पांड्याने वन डेमध्ये १७६९ धावा केल्या आहेत. यासोबतच त्याच्या नावावर ८४ बळींची नोंद आहे. हार्दिक पांड्या आगामी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सच्या जर्सीत दिसणार आहे. पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आपल्या पदार्पणाच्या (२०२२) हंगामातच विक्रम नोंदवला. पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातच्या संघाला पहिल्याच हंगामात किताब जिंकण्यात यश आले. पांड्याची एन्ट्री अन् कर्णधारपद हार्दिक पांड्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने १२३ आयपीएल सामन्यांत २३०९ धावा केल्या आहेत आणि ५३ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२४ च्या लिलावासाठी मुंबई इंडियन्सकडे १५.२५ कोटीच रक्कम शिल्लक होती आणि गुजरात हार्दिकला १५ कोटी देत होते. त्यामुळे मुंबईला हार्दिकला संघात घेण्यासाठी पैसे कमी पडले होते. त्यांनी १७.५ कोटींत खरेदी केलेल्या कॅमेरून ग्रीनला RCB सोबत ट्रेड करून पर्समधील रक्कम वाढवली अन् हार्दिकला मोठी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात घेतले. खरं तर मुंबईच्या संघात येण्यापूर्वी हार्दिकने एक मोठी अट ठेवली होती ती म्हणजे कर्णधारपद. त्यामुळे रोहित शर्माला कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले.