Hardik Pandya, IPL 2022 RR vs GT Live: राजस्थान विरूद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याने कर्णधार पदाला साजेशी खेळी करत संघाला १९२ धावांपर्यंत मजल मारून दिली आणि राजस्थानला १९३ धावांचे आव्हान दिले. पहिले तीन बळी झटपट गेल्यानंतर हार्दिकने मैदानात तळ ठोकत नाबाद ८७ धावांची खेळी केली. अभिनव मनोहर (४३) आणि डेव्हिड मिलर (नाबाद ३१) यांची त्याला उत्तम साथ मिळाली. या दमदार खेळीसह हार्दिक यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने जोस बटलरला मागे टाकत ऑरेंज कॅपचा मान मिळवला.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरातच्या सलामीवीरांना फारशी चमक दाखवता आली नाही. मॅथ्यू वेड १२ धावांवर रन आऊट झाला. विजय शंकर २ धावा काढून तर शुबमन गिल १३ धावा काढून झेलबाद झाला. पण त्यानंतर हार्दिक पांड्या आणि अभिनव मनोहर जोडीने गुजरातचा डाव सावरत ८६ धावांची भागीदारी केली. अभिनव मनोहर २८ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४३ धावा काढून माघारी परतला.
दोन्ही संघातील बदल
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) च्या संघाने ट्रेंट बोल्टला संघाबाहेर बसवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. त्याच्या जागी अष्टपैलू जेम्स नीशमला संघात स्थान देण्यात आले. गुजरात टायटन्सनेही संघात दोन महत्त्वाचे बदल केले. यश दयालला पदार्पणाची संधी देण्यात आली. दर्शन नळकांडेच्या जागी तो संघात आला. तसेच विजय शंकरला पुन्हा संघात स्थान मिळाले. त्याने साई सुदर्शनची जागा घेतली.
गुजरात टायटन्स: मॅथ्यू वेड (किपर), शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवातिया, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, यश दयाल
राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (किपर, कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, शिमरॉन हेटमायर, जेम्स नीशम, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल