भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि मॉडेल नताशा स्टँकोव्हिच यांचा घटस्फोट झाला. हार्दिक-नताशा दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची माहिती दिली. खरे तर मागील काही महिन्यांपासून नताशा आणि हार्दिक यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याची चर्चा होती. अखेर गुरुवारी १८ जुलैला या चर्चेला पूर्णविराम मिळाला. भारतीय संघ २७ जुलैपासून श्रीलंकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेत हार्दिकला संधी मिळाली असली तरी त्याच्याकडे कर्णधार किंवा उपकर्णधार यापैकी कोणतेच पद नाही. हार्दिक संघाचा भाग असताना सूर्याला कर्णधार बनवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
दरम्यान, घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या प्रथमच कॅमेरासमोर आला आणि चाहत्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या. हार्दिकच्या हसऱ्या चेहऱ्यामागे खूप दु:ख लपले असल्याची प्रतिक्रिया काही चाहत्यांनी दिली. हार्दिकचा व्हिडीओ समोर येताच चाहत्यांनी कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रियांचा वर्षाव केला. अनेकांनी नताशाला लक्ष्य करताना हार्दिकला खंबीर राहण्याचा सल्ला दिला. तर एका चाहत्याने 'हार मे संभलते मर्द को. जीत में रोते देखा है' अशी सर्वांचे लक्ष वेधणारी कमेंट केली.
घटस्फोटाची माहिती देताना हार्दिकने म्हटले की, चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर नताशा आणि मी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आणि हे नाते वाचवण्यासाठी सर्व काही दिले. पण आता आम्हा दोघांसाठी हाच योग्य निर्णय आहे असे आम्हाला वाटते. आमच्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता. एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण, परस्परांचा आदर आणि एकमेकांचा सहवास घेत आम्ही एक कुटुंब म्हणून वाटचाल केली.
मुलगा अगस्त्य याच्याबद्दलही त्यांनी लिहिले की, मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात अगस्त्य आहे, जो नेहमी आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असेल. आम्ही दोघे मिळून त्याची काळजी घेऊ. त्याला जगातील सर्व सुख मिळावे यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू आणि त्याच्या आनंदासाठी जे काही करता येईल ते करू. आम्हाला आशा आहे की तुमचा पाठिंबा मिळेल आणि या कठीण काळात आमची गोपनीयता तुम्ही समजून घ्याल.