इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ला २२ मार्चपासून सुरूवात होत आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीची लढत होणार आहे. आयपीएलच्या या पर्वातून हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) पुन्हा मैदानावर उतरणार आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पाय मुरगळल्यानंतर त्याला माघार घ्यावी लागली. त्यानंतर प्रचंड मेहनत घेत तो मागील महिन्यात नवी मुंबईत झालेल्या डी वाय पाटील ट्वेंटी-२० स्पर्धेत खेळला आणि आता आयपीएल २०२४ साठी सज्ज झाला आहे. पण, आजही त्याच्या मनाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्याची सल टोचतेय...
स्टार स्पोर्ट्सच्या खास कार्यक्रमात त्याने याबाबत आपले मन मोकळे केले. तो म्हणाला,''मी असा क्रिकेटपटू आहे जो दोन-तीन महिनेआधी सुरुवात करत नाही. या वर्ल्ड कपसाठी मी जवळपास वर्ष-दीड वर्ष तयारी केली होती. वर्ल्ड कपमध्ये जेव्हा मला दुखापत झाली, तेव्हा ती बरी होण्यासाठी २५ दिवस लागणार होते. तोपर्यंत वर्ल्ड कप संपणार होता. पण, मी लवकरात लवकर पुनरागमन करण्याचा निर्धार केला होता. जेव्हा मी संघातून बाहेर झालो, तेव्हा मी व्यवस्थापनाला सांगितले होती, की मी पाच दिवसांत परत येतोय...''
''माझ्या घोट्यावर तीन इंजेक्शन दिली गेली... घोट्यातून रक्त काढलं केलं. तरीपण मला लवकरात लवकर मैदानावर उतरायचे होते. माझ्यासाठी टीम इंडिया प्रथम आहे. पण, त्याचवेळी मला हेही माहित होतं की जर मी जबरदस्तीने लवकर बरे होण्याचा प्रयत्न केला, तर ही दुखापत आणखी वाढू शकते. पण, त्यावेळी माझ्याकडे त्याचे उत्तर नव्हते. त्यावेळी १ टक्के जरी संधी असती तर मी खेळायला उतरायला तयार होतो. पण, या प्रयत्नात दुखापत अधिक बळावली आणि त्यातून बरे होण्यासाठी ३ महिने लागले,''असेही हार्दिक म्हणाला.
त्याने पुढे सांगितले की,''मला त्यावेळी चालताही येत नव्हते. तरीही मी १० दिवस पेन किलर खाऊन पुन्हा टीम इंडियात येण्यासाठी प्रयत्न करत होतो. देशासाठी खेळणं ही माझ्यासाठी सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यात वर्ल्ड कप घरच्या मैदानावर खेळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यामुळे मला संघासोबत राहावे असे वाटत होते, पण मला नाही खेळता आलं.''