इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारतीय खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यावर परतणार आहेत. आयपीएल २०२२नंतर भारतीय संघ पहिल्याच ट्वेंटी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. ९ जूनपासून पाच सामन्यांच्या या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर आयर्लंड, इंग्लंड असे दौरे नियोजित आहेत. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून BCCI त्यानुसार प्लानिंग करत आहे. त्यामुळे ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघात काही प्रयोग होताना दिसणार आहेत. अशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कर्णधारच बदलण्याचा विचार BCCI करत असल्याचे वृत्त समोर येत आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी BCCI काही सीनियर खेळाडूंना विश्रांती देणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी या खेळाडूंना आराम मिळावा यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे. विश्रांती देण्यात येणार्या खेळाडूंमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह व रिषभ पंत ही नावं चर्चेत आहेत. अशात आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) किंवा शिखर धवन ( Shikhar Dhawan) यांच्यापैकी एकाकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्याचा विचार सुरू आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२मध्ये दमदार कामगिरी करताना प्ले ऑफचे पहिले तिकिट पटकावले आहे.
श्रीलंका व वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी निवडलेल्या बऱ्याच खेळाडूंना भारतीय संघात कायम राखले जाईल. सूर्यकुमार यादव व रवींद्र जडेजा यांचा समावेश त्यांच्या तंदुरुस्तीवर आहे, तर दीपक चहर हा या मालिकेला मुकणार आहे. ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक हुडा हे आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दिसतील. संजू सॅमसन यालाही संधी दिली जाईल. गोलंदाजी विभागात भुवनेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्णा, हर्षल पटेल, आवेश खान हे शर्यतीत आहेतच. फिरकीपटू आर अश्विन व युजवेंद्र चहल हेही संघात दिसतील. कुलदीप यादवचे पुनरागमन अपेक्षित आहे. मोहसिन खान व उम्रान मलिक यांना पदार्पणाची संधी मिळू शकते.
''सर्व सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली जाईल. रोहित, विराट, लोकेश, रिषभ व जसप्रीत हे इंग्लंड दौऱ्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे त्यांना आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विश्रांती दिली जाईल. इंग्लंड मालिकेसाठी सर्व सीनियर खेळाडू आम्हाला तंदुरुस्त व फ्रेश हवेत,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने PTIला सांगितले. ते पुढे म्हणाले,''विराट, रोहित व लोकेशच्या अनुपस्थितीत शिखर धवनने श्रीलंका मालिकेत भारताचे नेतृत्व सांभाळले होते. पण, हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सकडून प्रभावी कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्व कौशल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे तोही कर्णधारपदासाठी पर्याय आहे.''
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक
- पहिली ट्वेंटी-२० - ९ जून, दिल्ली
- दुसरी ट्वेंटी-२० - १२ जून, कटक
- तिसरी ट्वेंटी-२० - १४ जून, विझाक
- चौथी ट्वेंटी-२० - १७ जून, राजकोट
- पाचवी ट्वेंटी-२० - १९ जून, बंगळुरू