मुंबई - 24 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. या दौऱ्यासाठी होणाऱ्या संघनिवडीपूर्वी अष्टपैलू हार्दिक पांड्या तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याला न्यूझीलंड दौऱ्याला मुकावे लागणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ पाच टी-20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी रविवारी संघनिवड होणार आहे. कमरेला झालेल्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या गेल्या चार महिन्यांपासून संघाबाहेर आहे. आता न्यूझीलंड दौऱ्यासाठी तो तंदुरुस्त होऊन संघात पुनरागमक करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र पांड्या नुकत्याच झालेल्या तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरला. त्यामुळे त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही अवधी लागणार आहे. शनिवारी मुंबईत झालेल्या तंदुरुस्ती चाचणीत नापास झाल्यानंतर हार्दिक पांड्याला न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारत अ संघातही स्थान देण्यात आलेले नाही. पांड्याऐवजी तामिळनाडूचा कर्णधार विजय शंकर याला भारत अ संघात स्थान देण्यात आले आहे. भारत अ संघ न्यूझीलंडमध्ये तीन लीस्ट ए सामने खेळणार आहे. भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, वेस्ट इंडिजनंतर नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही संघाने विजय मिळवला आहे. मात्र तळाच्या फळीत हार्दिक पांड्याची उणीव संघाला भासत आहे. त्यामुळे तंदुरुस्त झाल्यास न्यूझीलंडसारख्या महत्त्वाच्या दौऱ्यात पांड्याची भूमिका निर्णायक ठरली असती.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे 'हा' दिग्गज खेळाडू संघाबाहेर
न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे 'हा' दिग्गज खेळाडू संघाबाहेर
न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ पाच टी-20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 10:47 AM