Prithvi Shaw, Yo Yo Test: IPL 2022 स्पर्धेची सुरूवात २६ मार्चपासून होणार आहे. या स्पर्धेआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंची यो-यो चाचणी घेतली. दिल्ली कॅपिटल्सचा (डीसी) सलामीवीर पृथ्वी शॉ ही चाचणी पास होऊ शकला नाही. पण गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मात्र चाचणी पास झाला. त्यामुळे पृथ्वी शॉ याला ट्रोल करण्यात आलं. पण आता पृथ्वीने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलंय.
चाचणीत नापास झाल्यानंतर पृथ्वी शॉ सोशल मीडियावर ट्रेंड झाला. काहींनी त्याला ट्रोल केलं, तर काही चाहते ही बातमी शेअर करताना नाराज दिसले. पृथ्वीने मात्र एक पोस्ट शेअर करत ट्रोलर्सना प्रतिक्रिया दिली. 'माझी भूमिका समजून घेतल्याशिवाय मला जज करू नका', असं तो म्हणाला. माझी परिस्थिती समजून घेतल्याशिवाय कोणीही काहीही अंदाज बांधू नका, असं त्याने लिहिलं. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना पृथ्वी शॉने लिहिले की तुम्हाला माझी स्थिती माहीत नाही. त्यामुळे कृपया मला जज करू नका. तुम्ही तुमचं कर्म करत राहा.
बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे ही यो-यो चाचणी घेण्यात आली. बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीत समाविष्ट असलेल्या सर्व खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी ही यो-यो चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक होतं. पृथ्वी शॉ यातून वाचला. त्याच्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे तो बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये नसल्यामुळे चाचणीत अपयशी ठरल्यानंतरही तो आयपीएल खेळू शकणार आहे.