Hardik Pandya Mumbai Indians, IPL 2024 MI vs SRH: मुंबई आणि हैदराबाद या दोन संघांमध्ये झालेल्या बुधवारच्या सामन्यात धावांचा पाऊस पडला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांमध्ये तब्बल 277 धावा कुटल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनीही निकराची झुंज दिली, मात्र 20 षटकात मुंबईला पाच गड्यांच्या मोबदल्यात 246 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ 31 धावांनी विजयी झाला. दोनही संघांच्या गोलंदाजांसाठी हा सामना वाईट स्वप्नाप्रमाणे ठरला. हैदराबादकडून हेनरिक क्लासेन याने 34 चेंडूत नाबाद 80 आणि अभिषेक शर्माने 23 चेंडू 63 तर ट्रेव्हिस हेडने 24 चेंडूत 62 धावा करत मुंबईच्या गोलंदाजांचा अक्षरशः चुराडा केला. मुंबईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवल्यानंतरही कर्णधार हार्दिक पांड्याने मात्र सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनी दरम्यान एका गोलंदाजाबाबत कौतुकाचा वर्षाव केला. जाणून घेऊया कोणाबद्दल बोलला हार्दिक पांड्या...
मुंबई इंडियन्सने सामन्यात एका नव्या गोलंदाजाला संधी दिली होती. 17 वर्षीय क्वेना मफाका याने या सामन्यातून आयपीएल पदार्पण केले. मात्र त्याचे पदार्पण फारसे चांगले ठरले नाही. त्याला चार षटकांमध्ये एकही बळी मिळवता आला नाही, याउलट १६ पेक्षाही जास्त सरासरीने धावा देत त्याने एकूण 66 धावा दिल्या. असे असूनही हार्दिक पांड्याने त्याच्या हिमतीची दात देत त्याचे कौतुक केले. पांड्या म्हणाला, "मला असं वाटतं की त्याने उत्तम गोलंदाजी केली. आपला पहिलाच सामना खेळत असताना इतक्या मोठ्या प्रेक्षकांच्या संख्येसमोर कोणालाही दडपण येणे स्वाभाविक आहे. असे असून देखील त्याने आपल्या प्रतिभेवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या प्लॅनिंग प्रमाणेच गोलंदाजी करत राहिला. त्याच्या गोलंदाजीवर भरपूर धावा होत होत्या, पण तरी देखील तो मागे हटला नाही. त्याचा लढाऊपणा मला नक्कीच आवडला. तो नक्कीच प्रतिभावान गोलंदाज आहे. आणखी काही सामने खेळल्यानंतर त्याच्यामध्ये शंभर टक्के सुधारणा दिसून येईल", असा विश्वास हार्दिक पांड्या क्वेना मफाका बद्दल बोलताना व्यक्त केला.
दरम्यान, सामन्यामध्ये एकूण 40 षटकांच्या खेळात 500 पेक्षाही जास्त धावा कुटल्या गेल्या. हैदराबादच्या संघाने फलंदाजी करताना 277 धावांचा डोंगर रचला. हेनरिक क्लासेन याने 34 चेंडू नाबाद 80 धावा केल्या. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड या दोघांनीही तुफानी फटकेबाजी केली. अभिषेक शर्माने केवळ 16 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या तिघांच्या फटकेबाजीच्या जोरावर हैदराबादने मुंबईला 278 धावांचे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने देखील तडाखेबाज सुरुवात केली. मुंबईकडून तिलक वर्माने 64 धावांची खेळी केली. ईशान किशनने १३ चेंडूत 34 धावा केल्या तर टीम डेविडने शेवटपर्यंत झुंज देत 22 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. परंतु मुंबईच्या संघाला हैदराबादने दिले लक्ष्य पूर्ण करता आले नाही आणि त्यांचा हंगामातील सलग दुसरा पराभव झाला.