- अयाझ मेमन
हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांच्यावरील बीसीसीआयकडून केलेली निलंबनाची कारवाई तूर्तास तरी मागे घेण्यात आली. ही भारतीय क्रिकेटसाठी एक चांगली बातमी आहे. माझ्या मते, हा योग्य निर्णय आहे. स्पष्ट आहे की, या दोघांनी चुकी केली होती. ते एका शोमध्ये ज्या पद्धतीने आक्षेपार्ह बोलले ती मोठी चूक आहे. मात्र, या चुकीची शिक्षा किती असावी यावर वाद आणि चर्चा रंगली. अखेर मोठ्या चर्चेनंतर या दोघांवरील निलंबन मागे घेण्यात आले. यासाठीचे श्रेय नव्याने नियुक्त केलेले न्यायमित्र पी. एम. नरसिंह यांना द्यावे लागेल. कारण, त्यांनीच या दोघांबाबतचा निर्णय दिला.
हा निर्णय मला यासाठी योग्य वाटतो; कारण सर्वांचे लक्ष या खेळाडूंवरून हटले होते आणि सध्या भारतीय क्रिकेट प्रशासनाच्या दोन सदस्यांतही ताळमेळ नाही. डायना एडुल्जी आणि विनोद रॉय यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. समितीत दोघांमध्ये जर वाद असतील तर हार्दिक आणि राहुल यांच्या प्रकरणावर लवकर निर्णय तरी कसा लागेल, अशी शक्यता होती. हार्दिक आणि राहुल यांना ऑस्ट्रेलिया दौरा सोडून परत बोलविण्यात आले होते. हीच त्यांच्यासाठी एक शिक्षा होती, असे मला वाटते.
करण जोहरच्या टॉप शोमध्ये या दोघांनी ज्या पद्धतीने स्वत:ला प्रेझेंट केले. महिलांबाबत आक्षेपार्ह असे विधान केले होते. ते निंदनीय आहे. एखाद्या क्रिकेटरने लैंगिकतेबाबत जाहीरपणे बोलणे हे क्रिकेटच्या प्रतिमेला धक्का देणारे आहे. निश्चितपणे, या दोघांची चुकी होती; पण त्यावर किती शिक्षा व्हावी हा मुद्दा होता. कारण, या दोघांवर ‘मी टू’ किंवा इतर कोणतेही आरोप नव्हते. त्यामुळे माझ्या मते, ही एवढी मोठी चूक नव्हती, जेवढा तिचा बोलबाला करण्यात आला. या दोघांवरील आरोपामुळे टीम प्रशासनापुढे प्रश्न होते. निवडकर्त्यांनाही कळत नव्हते की हे दोघे खेळतील किंवा नाही. आता पुढे विश्वचषक आहे. केवळ ९ सामने उरले आहेत. अशात केवळ १५ जणांचा संघ निवडण्यात येईल. त्यात या दोघांचा विचार होणे महत्त्वाचे आहे. जर हे दोघे सामने खेळलेच नाहीत तर त्यांची निवड तरी कशी होईल? प्रकरणावर गूढ कायम होते. आता खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करावे लागेल की ते विश्वचषकासाठी सक्षम आहेत की नाहीत. एक महिन्यापूर्वी संघाची निवड होईल. हार्दिकची जागा निश्चित वाटते; पण राहुलबाबत अनिश्चितता आहे.
दुसरा मुद्दा असा आहे की, खेळाडूंना कोणती शिक्षा असावी? याबाबत महान खेळाडू राहुल द्रविडने आपले स्पष्ट मत मांडले ज्याचा मी आदर करतो. त्याच्या मते, खेळाडूंकडून चुका होतात. यापूर्वीसुद्धा झालेल्या आहेत. मात्र, अशा प्रकरणांवर अतिउत्साही होता कामा नये. खासकरून विनोद रॉय आणि डायना एडुल्जी यांनी. कारण, यांच्यातच वाद आहेत. या दोघांतील वादामुळे हे प्रकरण लांबले. नाही तर हे प्रकरण सोपे होते. राहुलचा हा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतो.
दुसरीकडे, खेळाडूंना शिक्षा व्हावी या मताचा मी आहे; पण ती किती व्हावी याचाही विचार व्हायला हवा. याचे ताजे उदाहराण द्यायचे झाल्यास मुंबईच्या मुशीर खानचे देता येईल. या १४ वर्षीय मुंबईच्या कर्णधारावर असभ्य वर्तणुकीमुळे कारवाई करण्यात आली होती. त्याच्यावर तीन वर्षांची बंदी लावण्यात आली होती. १४ वर्षीय खेळाडूवर ३ वर्षांची बंदी म्हणजे त्याचे करिअरच संपुष्टात आणण्यासारखेच आहे. १९९५ मध्ये टेनिस कोर्टवर एक छोटा खेळाडू होता जो रॅकेट्स तोडायचा आणि असभ्य वर्तणूक करायचा. मात्र, त्याला टीम व्यवस्थापनाने सांभाळले. समजावून सांगितले आणि तोच खेळाडु पुढे स्टार बनला, त्याचं नाव आहे रॉजर फेडरर.
(संपादकीय सल्लागार)
Web Title: Hardik Pandya, Rahul's suspense mystery is finally over
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.