Hardik Pandya Rashid Khan Garba, IPL 2022: गुजरात टायटन्स (Gujarat Titans) हा संघ IPL 2022 च्या हंगामात सामील होणारा नवीन संघ आहे. मात्र या संघाची कामगिरी अतिशय जोरदार आहे. या संघाने यंदाच्या हंगामात आतापर्यंत ९ सामने खेळले असून त्यापैकी ८ सामने जिंकले आहेत. १६ गुणांसह गुजरात संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. गुजरातचा संघ आपल्या कामगिरीमुळे अप्रतिम प्रवास करत प्रगती करतोय. याच दरम्यान, १ मे रोजी संघाने गुजरात स्थापना दिन साजरा केला. यावेळी संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि उपकर्णधार राशिद खान हे गुजराती रंगात रंगलेले दिसले. तसेच त्यांनी गुजरातचं खास गरबा नृत्यदेखील केले.
गुजरात स्थापना दिनानिमित्त फ्रँचायझीने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये हार्दिक आणि राशिदसह बाकीच्या खेळाडूंनीही जोरदार धमाल केली. राहुल तेवातिया आणि संघाचे प्रशिक्षक आशिष नेहरा यांनी दांडिया खेळून मजा केली. गुजरात फ्रँचायझीने एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये खेळाडू दांडिया-गरबा खेळताना दिसले. याच व्हिडिओमध्ये राशिद खानही गुजराती पद्धतीने पगडी घातलेला दिसला.
वास्तविक, स्वातंत्र्याच्या वेळी महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही एकच प्रांत होते. यानंतर १ मे १९६० रोजी दोघेही वेगळे होऊन वेगळे राज्य झाले. तेव्हापासून, या दिवशी म्हणजेच १ मे रोजी गुजरात स्थापना दिन साजरा केला जातो. दरम्यान, गुजरात टायटन्सचा पुढील सामना मंगळवारी होणार आहे. हा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर होईल. गुजरातचा संघ हा सामना जिंकताच प्ले-ऑफमधील आपले स्थान निश्चित करेल.