नवी दिल्ली : सीव्हीसीच्या अधिपत्याखालील अहमदाबाद फ्रॅन्चायजीला आयपीएलमध्ये खेळण्यास बीसीसीआयने परवानगी बहाल केली असून, अष्टपैलू हार्दिक पांड्या या संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. अहमदाबाद संघ ५६२५ कोटीत खरेदी करणाऱ्या सीव्हीसीला बीसीसीआयकडून लेटर ऑफ इंटेंट (परवानगी बहाल करणे) पत्र मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. यासाठी कायदेशीर बाबींची पडताळणी आवश्यक होती.
याचे कारण सीव्हीसी युरोपमध्ये सट्टेबाजीवर पैैसा लावते, हे होते. भारतात मात्र त्यांच्याकडून अशा कुठल्याही बाबींचे संचालन होत नाही. अशावेळी सीव्हीसीला मान्यता दिल्यास कायद्याच्या कचाट्यात सापडणार तर नाही ना, अशी बीसीसीआयला शंका होती. आयपीएलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिकला अहमदाबाद संघाचा कर्णधार नियुक्त करण्यात आले आहे. लिलावाआधी संघाला तीन खेळाडू निवडण्याचा अधिकार आहे.
स्थानिक खेळाडू म्हणून त्यांनी अष्टपैलू हार्दिकच्या नावाला पसंती दर्शविली. याशिवाय दुसरा खेळाडू म्हणून अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान आणि तिसरा खेळाडू म्हणून यष्टिरक्षक- फलंदाज ईशान किशन यांच्यासोबतचा करार अंतिम टप्प्यात आहे.’अहमदाबादने आशिष नेहराला मुख्य कोच, विक्रम सोळंकी यांना क्रिकेट संचालक आणि गॅरी कर्स्टन यांना मेंटॉर नेमले आहे. यंदाचे आयपीएल हे हार्दिकसाठी पुनरागमनाची स्पर्धा ठरावी. आयसीसी टी-२० विश्वचक संपल्यापासून तो संघाबाहेर आहे.