मुंबईः दुखापतीतून नुकत्याच सावरलेला हार्दिक पांड्या भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो संघातून बराच काळ दूर आहे आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील संघातही त्याचा समावेश नाही. मात्र, तिसऱ्या कसोटीत त्याच्या नावाचा विचार होऊ शकतो. वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यात त्याने तंदुरूस्ती सिद्ध केली आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात बडोदा संघाचे प्रतिनिधित्व करताना हार्दिकने दमदार कामगिरी केली. त्याने मुंबईचा निम्मा संघ तंबूत पाठवत आपली दावेदारी मजबूत केली आहे.
दुबईमध्ये झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिकला दुखापत झाली होती. त्यानंतर आतापर्यंत हार्दिक कोणत्याही सामन्यात खेळला नव्हता. पण, तो आता पूर्णपणे फिट झाला आहे. वानखेडेवर सुरू असलेल्या सामन्यात त्याने 18.5 षटकं टाकली आणि 81 धावा देत 5 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे हार्दिकने अन्य सहकारी गोलंदाजांच्या तुलनेत सर्वाधिक षटकं टाकली. कर्णधार सिद्धेश लाड ( 130) आणि श्रेयस अय्यर ( 178) यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 465 धावांचा डोंगर उभा केला आहे. प्रत्युत्तरात बडोदा संघाने 1 बाद 31 धावा केल्या आहेत.
संपूर्ण धावफलकासाठी क्लिक करा