जामनगर : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पांड्या सध्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. क्रिकेटपासून दूर असलेला पांड्या अलीकडेच गुजरातमधील जामनगर येथे पोहोचला. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये गेलेल्या हार्दिकचे भव्य स्वागत करण्यात आले. हार्दिकच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. घोडे, वाद्ये आणि सजावटीच्या वस्तू लावून हार्दिक पांड्याचे स्वागत करण्यात आले.
अलीकडेच मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने हार्दिक पांड्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला. पण, ३६ वर्षीय रोहित आणखी किती ट्वेंटी-२० क्रिकेट खेळेल याची शाश्वती नसल्याने मुंबईच्या संघ व्यवस्थापनाने कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला. खरं तर रोहित शर्मा मागील ट्वेंटी-२० विश्वचषकापासून ट्वेंटी-२० क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे हार्दिवर जबाबदारी सोपवून मुंबईच्या फ्रँचायझीने भविष्याचा विचार करून पाऊल टाकल्याचे दिसते. पांड्याचे 'हार्दिक' स्वागत
हार्दिक पांड्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने १२३ आयपीएल सामन्यांत २३०९ धावा केल्या आहेत आणि ५३ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२४ च्या लिलावासाठी मुंबई इंडियन्सकडे १५.२५ कोटीच रक्कम शिल्लक होती आणि गुजरात हार्दिकला १५ कोटी देत होते. त्यामुळे मुंबईला हार्दिकला संघात घेण्यासाठी पैसे कमी पडले होते. त्यांनी १७.५ कोटींत खरेदी केलेल्या कॅमेरून ग्रीनला RCB सोबत ट्रेड करून पर्समधील रक्कम वाढवली अन् हार्दिकला मोठी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात घेतले. खरं तर मुंबईच्या संघात येण्यापूर्वी हार्दिकने एक मोठी अट ठेवली होती ती म्हणजे कर्णधारपद.
दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आपल्या पदार्पणाच्या (२०२२) हंगामातच विक्रम नोंदवला. पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातच्या संघाला पहिल्याच हंगामात किताब जिंकण्यात यश आलं. मात्र, हार्दिकच्या जाण्याने गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला. खरं तर गुजरातच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंची मोठी फळी असून शुबमन गिल व्यतिरिक्त, केन विल्यमसन, मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा, विजयशंकर, साई किशोर, राशिद खान, डेव्हिड मिलर हे नामांकित खेळाडू गुजरातच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने गुजरातच्या संघाची धुरा भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिलच्या खांद्यावर सोपवली. गिलसह टायटन्सच्या सर्व खेळाडूंनी मागील दोन हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. त्यांचे नेतृत्व करण्यात हार्दिक यशस्वी ठरला.