बडोदा : कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) निलंबित केले. त्यानंतर हार्दिककडे ब्रँड्सनेही पाठ फिरवली आणि खार जिमखानाने त्याचे मानद सदस्यत्व रद्द केले. हार्दिकच्या अडचणी काही केल्या कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीत. निलंबनाच्या कारवाईनंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं आहे आणि तो कोणाचे फोनही उचलत नाही, अशी माहिती हार्दिकचे वडील हिमांशु पांड्या यांनी दिली.
एका इंग्रजी वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली. ते म्हणाले,''ऑस्ट्रेलियातून परतल्यापासून त्याने घराबाहेर पाऊल टाकलेले नाही. तो कोणाच्या फोनचेही उत्तर देत नाही. त्याने भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना पाहिला आणि आराम केला. गुजरातमध्ये सणाचं वातावरण आहे. क्रिकेटमध्ये व्यग्र असल्यामुळे त्याने गेल्या काही वर्षांत कुटुंबीयांसोबत तो सण साजरा करू शकला नव्हता. मात्र, आता तो घरी असूनही सण साजरा करत नाही.''
कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात हार्दिकसोबत लोकेश राहुलही होता आणि बीसीसीआयने या दोघांवर निलंबनाची कारवाई करून त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून माघारी बोलावलं. हिमांशु पांड्या पुढे म्हणाले,''हार्दिकला मकरसंक्रातीत पतंग उडवणे फार आवडते आणि यंदा त्याच्याकडे पतंग उडवण्यासाठी वेळही होता. मात्र, सध्या प्रतिकुल परिस्थितीमुळे त्याने सण साजरा करणे टाळले. निलंबनाच्या कारवाईमुळे तो खूप निराश झाला आहे आणि त्याने त्या विधानाबद्दल माफीही मागितली आहे. या प्रकरणावर त्याच्याशी चर्चा न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. बीसीसीआयच्या निकालाची आम्ही वाट पाहत आहोत.''