गेल्या वर्षी दुबईच्या मैदानावर T20 विश्वचषक खेळला गेला तेव्हा हार्दिक पांड्या हा भारतीय संघाची कमकुवत बाजू ठरत होता. याचं कारण म्हणजे त्याचा फिटनेस, ज्यामुळे तो पूर्णपणे गोलंदाजी करू शकला नाही आणि त्याच्याकडून अपेक्षित अशी फलंदाजीही पाहायला मिळाली नाही. पण यावेळी ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या वर्ल्डकपमध्ये तोच हार्दिक पंड्या संघाची ताकद म्हणून पाहायला मिळत आहे. क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी देखील पंड्या संघाचा एक्स फॅक्टर असल्याचं मान्य केलं आहे. पण अवघ्या एका वर्षात पंड्यानं स्वत:ची कामगिरी कशी बदलली? एवढ्या मोठ्या गंभीर दुखापतीवर मात करुन पंड्यानं पुनरागमन कसं केलं? खुद्द पांड्यानं याचं गुपित सांगितलं आहे.
हार्दिक पांड्याला काही वर्षांपूर्वी त्याचे भविष्य काय असेल याची कल्पना नव्हती, परंतु एकदा का अपयशाची भीती दूर झाली आणि तो पुन्हा मैदानावर परतला. बॉलिंग फिटनेस परत मिळवण्यासाठी त्यानं प्रचंड मेहनत घेतली. तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला आणि IPL-2022 मध्ये गुजरात टायटन्स या नवीन संघाचं नेतृत्व केलं. भारतासाठी देखील काही महत्त्वपूर्ण अष्टपैलू खेळी त्यानं साकारल्या.
स्वतःला विचारला महत्वाचा प्रश्नया वर्षातील त्याच्या दोन्ही सर्वात महत्त्वाच्या खेळी या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्याच ठरल्या. ज्यात त्याने खेळाच्या दोन्ही विभागात चांगली कामगिरी केली. "एक काळ असा होता की माझं पुढे काय होणार आहे हे मला माहीत नव्हतं. त्यामुळे मी माझ्याच विचारात आणि जगात खूप गुंतून पडायचो. मग मी स्वतःला एक प्रश्न विचारला, की तुला तुझ्या आयुष्यात काय करायचंय आणि तुला काय हवं आहे?", असं हार्दिक म्हणाला.
"मी सर्वात आधी माझ्या मनातली अपयशाची भीती काढून टाकली आणि पुढे काय होणार आहे किंवा त्याचे परिणाम काय होणार आहेत, लोक काय म्हणतील याचा विचार करण सोडून दिलं. पण त्याचवेळी मी लोकांच्या मताचा आदरही करत होतो", असंही हार्दिक पुढे म्हणाला.
बॅटिंगसह बॉलिंगमध्येही उत्तम कामगिरीजर तुम्ही पांड्याच्या एकंदर देहयष्टी आणि कामगिरीकडे बारकाईने पाहिले तर २०१८-१९ सालचा हार्दिक आणि आता २०२२ सालचा हार्दिक यात खूप फरक जाणवेल. गेल्या वर्षीपर्यंत पांड्याची गोलंदाजी हा चिंतेचा विषय होता, पण आता तो संघासाठी फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही भूमिका उत्तमरित्या बजावत आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात पंड्याने निर्णायक वेळी तीन बळी घेत पाकिस्तानला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. यानंतर त्याने विराट कोहलीसोबत पाचव्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली आणि भारताला सामन्यात कमबॅक करुन दिले. ज्या क्षणाला भारताचा पराभव निश्चित आहे असं वाटत होतं त्यावेळी पंड्यानं मैदानात जम बसवून स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं.