Hardik Pandya MS Dhoni IND vs SA T20: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा चौथा टी२० सामना ८२ धावांनी जिंकला. भारतासाठी जरी हा विजय खूप मोठा असला तरी भारतीय संघाने सुरूवातीला चाहत्यांना निराश केले होते. दिनेश कार्तिकची २७ चेंडूत ५५ धावा आणि हार्दिक पांड्याची ३१ चेंडूत ४६ धावांची खेळी रंगल्यामुळे भारताला ६ बाद १६९ धावांपर्यंत मजल मारता आली. हार्दिक जेव्हा मैदानात आला तेव्हा संघाची अवस्था सातव्या षटकात तीन बाद अशी होती. हार्दिकने तेथून पुढे शेवटपर्यंत खिंड लढवली आणि शेवटच्या पाच षटकांत फटकेबाजीही केली. सामना संपल्यानंतर, हार्दिक पांड्याला खेळीबद्दल विचारण्यात आले. तेव्हा त्याने धोनीचे नाव घेत त्याचे आभार मानले.
"मी गुजरात टायटन्समधून टीम इंडियात आलो, पण माझ्यासाठी काहीही बदललेलं नाही. माझ्या जर्सीवर ज्या संघाचा लोगो असतो त्या संघासाठी मी सर्वस्व पणाला लावतो. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार असतो की जी 'मॅचविनिंग' खेळी मी खेळतो, तशीच खेळी मला किती सातत्याने खेळता येऊ शकेल. माझ्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरूवातीला मला धोनीने एक गोष्ट सांगितली होती. मी त्याला विचारलं होतं की, 'तू मैदानात उतरताना स्वत:वर असलेलं दडपण कसं घालवतोस?'. त्यावर त्याने एका वाक्यात उत्तर दिलं होतं की, 'जेव्हा मैदानात जाशील तेव्हा त्याने स्वत:च्या धावांकडे लक्ष न देता आपल्या संघाला आता कशाची गरज आहे याकडे लक्ष ठेव'. धोनीच्या या एका वाक्याने माझं क्रिकेटर म्हणून आयुष्यच बदललं", असा किस्सा हार्दिकने सांगितला.
"धोनी त्या दिवशी जे काही बोलला ते मला खूप आवडलं. धोनीचं ते वाक्य माझ्या डोक्यात पक्क बसलं आणि मी त्या दृष्टीने विचार करायला लागलो. त्यामुळे मी आता ज्या प्रकारचा क्रिकेटर आहे, त्यात धोनीचा खूप मोठा वाटा आहे. आता मी कोणत्याही क्रमांकावर खेळायला मैदानात गेलो तरी मी खेळाचा आणि सामन्याचा अंदाज घेतो. मग मी माझ्या फलंदाजीची रणनिती ठरवून त्या प्रमाणे खेळतो", असेही हार्दिकने स्पष्ट केले.