MS Dhoni Hardik Pandya, Sholay 2 coming soon: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी२० सामना २७ जानेवारीला रांचीमध्ये खेळवला जाणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय टी२० संघ बुधवारी रांचीला पोहोचला. भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत क्लीन स्वीप केले. आता २७ जानेवारी पासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका रंगणार आहे. याच दरम्यान, हार्दिक आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा एक फोटो व्हायरल होत आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीला पुन्हा एकदा T20I मालिकेतून विश्रांती देण्यात आली असून, हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी बुधवारी रांचीला पोहोचला. पहिला सामना रांची येथील जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे. रांचीला पोहोचताच हार्दिकने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली. हार्दिकने या भेटीचे दोन फोटो शेअर केले आहेत आणि त्यासोबत 'शोले 2 लवकरच येत आहे' असे लिहिले. या फोटोमध्ये हार्दिकने धोनीसोबत जय-वीरू पोज दिली. शोले चित्रपटात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची भूमिका होती आणि हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. जय-वीरूच्या मैत्रीवर आधारित हा चित्रपट खूप गाजला होता.
हार्दिक पांड्या आणि धोनीचे नाते खूप चांगले आहे. हार्दिकने धोनीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इतकेच नाही तर धोनीने आपल्या करिअरमध्ये कशी मोठी भूमिका बजावली आहे, याचा उल्लेख हार्दिक नेहमी करतो. एवढेच नाही तर कर्णधारपदाच्या युक्त्या धोनीकडून शिकल्याचेही हार्दिक सांगतो. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे पण तरीही तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळतो. असे मानले जात आहे की आयपीएल 2023 हा धोनीचा खेळाडू म्हणून शेवटचा हंगाम असू शकतो.