Hardik Pandya Pakistani Journalist, IND vs NZ Champions Trophy 2025: भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. २०१३ नंतर पहिल्यांदाच भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावण्याचा मान मिळाला. या विजयात सर्वच खेळाडूंनी मोलाचा वाटा उचलला. पण हार्दिक पांड्याचे विशेष कौतुक केले जात आहे. संथ पिचवर चार फिरकीपटू आणि केवळ एक स्पेशलिस्ट वेगवान गोलंदाज खेळवत असताना, दुसऱ्या बाजूने हार्दिकने वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळली. त्याच्यामुळे भारताला चांगली कामगिरी करण्यास मदत झाली. विजेतेपद जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्यानेपाकिस्तानीपत्रकारांना बोलती बंद केली.
पाकिस्तानी पत्रकाराचा प्रश्न
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर, पांड्या पत्रकार परिषदेत आला आणि त्याला पहिला प्रश्न एका पाकिस्तानी पत्रकाराने विचारला. पत्रकार म्हणाला, "सर्वप्रथम तुमचे अभिनंदन, तुम्ही जिंकलात. माझा प्रश्न असा आहे की भारताने दुबईमध्ये खेळलेले सर्व सामने जिंकले. प्रत्येक सामन्यात खूप प्रेक्षक होते. पाकिस्तानी लोकांनाही वाटते की भारताने तिथे येऊन खेळावे. भारतीय संघाचे खूप चाहते पाकिस्तानातही आहेत. या संदर्भात काय म्हणाल? तुम्हाला यावंसं वाटतं की नाही?" असा सवाल विचारण्यात आला.
हार्दिकने दिलं उत्तर
"आम्ही जिंकलो याचा आम्हाला आनंद आहे. तुम्हाला जे प्रश्न पडले आहेत ते योग्य आहेत. आम्हालाही चाहत्यांच्या समोर खेळायला आवडते. पाकिस्तानात येऊन खेळणे आता होऊ शकले नाही. आम्ही पाकिस्तानात का गेलो नाही किंवा कुठे जायला हवे याबद्दल बोलणे हे माझ्या अधिकारक्षेत्राबाहेरचे आहे. पण मला खात्री आहे की दुबईतील पाकिस्तानी नागरिकांना आमचा खेळ नक्कीच आवडला असेल," असे हार्दिकने हसत-हसत उत्तर दिले.
दरम्यान, दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी तीन वेळा जिंकणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला आहे. २००२ साली भारताला ही ट्रॉफी विभागून घ्यावी लागली. २०१३ साली भारताने इंग्लंडला हरवून विजेतेपद पटकावले. तर २०२५ मध्ये न्यूझीलंडला पराभूत करत भारताने विजय मिळवला. याशिवाय, ICCच्या सलग दोन स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवण्याची किमया साधणाराही भारत हा एकमेव देश ठरला. भारताने २०२४ मध्ये टी२० वर्ल्डकप जिंकला. पाठोपाठ रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले.