T20 World Cup : टी २० वर्ल्डकप नावावर करत टीम इंडियाने क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली. वर्ल्डकप घेऊन टीम इंडिया गुरुवारी(४ जुलै) मायदेशी परतली. भारतात परतल्यानंतर टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी मोदींनी क्रिकेटर्सशी संवाद साधला. मोदींशी संवाद साधताना अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्यानेही त्याच्या भावना व्यक्त करत ट्रोलर्सला चोख उत्तर दिलं आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्यावर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबादारी सोपविण्यात आली होती. रोहित सोडून हार्दिकला कॅप्टन्सी दिल्याने नाराज चाहत्यांनी त्याला ट्रोल केलं होतं. आयपीएलमधील कामगिरीमुळेही हार्दिकला ट्रोल केलं गेलं होतं. क्रिकेटच्या मैदानावरही हार्दिकला चाहत्यांकडून वाईट वागणूक मिळाली होती. तो काळ हार्दिकसाठी खूप कठीण होता. पण, हार्दिकने कधीच ट्रोलर्सला उत्तर दिलं नाही. मात्र हार्दिकने टी २० वर्ल्डकपमध्ये उत्तम कामगिरी करत ट्रोलर्सची बोलती बंद केली.
याबाबतच हार्दिक मोदींशी संवाद साधताना म्हणाला, "मागील सहा महिने माझ्यासाठी खूप कठीण होते. क्रिकेटच्या मैदानावरही मला ट्रोल केलं गेलं. पण, मी ठरवलं होतं की मी याला खेळाने उत्तर देणार. कधीच मी त्यांना तोंडाने उत्तर देणार नाही. मी तेव्हाही स्पीचलेस होतो आणि आताही काही सुचत नाहीये. तुम्हाला आयुष्यात नेहमी संघर्ष करावा लागतो. तुम्ही कायम लढत असता. कधीच मैदान सोडून जाऊ नका. कारण, मैदानच तुम्हाला अपयश दाखवतं आणि तेच सक्सेसपर्यंत घेऊन जातं. माझा मेहनतीवर आणि स्वत:वर विश्वास होता. यात मला टीमची आणि प्रशिक्षकांचीही साथ मिळाली. मी तयारी केली आणि देवाचे आशीर्वाद मिळाले".
हार्दिकने टी२० वर्ल्डकपमध्ये उत्तम खेळी केली. पांड्याने अंतिम लढतीत २० धावांत ३ बळी घेतले होते.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) टी-२० क्रमवारीत अष्टपैलूंमध्ये संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल अष्टपैलू ठरणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.