Hardik Pandya Complain to West Indies: भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर तेथील व्यवस्थेबाबत तक्रार केली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या तिसऱ्या वन डे सामन्यातील विजयानंतर येथील व्यवस्थेत सुधारणा करणे आवश्यक असल्याचे तो म्हणाला. आम्ही लक्झरी सुविधा मागत नाहीत, फक्त मूलभूत गोष्टींमध्ये सुधारणा हव्या आहेत, असे हार्दिकने सांगितले. त्याला काय त्रास झाला हे उघडपणे सांगितले नाही, परंतु प्रवासादरम्यान आलेल्या अडचणींकडे त्याने लक्ष वेधले. तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये हार्दिकने भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविले. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती दिल्यानंतर त्याला ही जबाबदारी मिळाली आहे. भारताने वनडे मालिका २-१ ने जिंकली.
यंगिस्तान ट्वेंटी-२० मालिकेसाठी सज्ज; उद्यापासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण वेळापत्रक
त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळलेला तिसरा सामना २०० धावांनी जिंकल्यानंतर हार्दिकने सांगितले की, 'मी जिथे खेळलो त्यापैकी हे मैदान सर्वोत्तम आहे. अनेक गोष्टी चांगल्या होऊ शकतात. पुढच्या वेळी आम्ही वेस्ट इंडिजमध्ये आलो, तेव्हा परिस्थिती चांगली होऊ शकते. प्रवासापासून अनेक गोष्टी पहाव्या लागतात. गेल्या वर्षीही काही अडचणी आल्या होत्या. त्यामुळे वेस्ट इंडीज बोर्डाने लक्ष द्यावे. आम्हाला चैनीची गरज नाही तर काही मूलभूत गोष्टींची गरज आहे. याशिवाय इथे येऊन चांगले क्रिकेट खेळायला मजा आली.'
त्रिनिदाद ते बार्बाडोसला जाणारे रात्रीचे विमान सुमारे चार तास उशिराने सुटल्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंनी बीसीसीआयकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पहिल्या वन डेपूर्वी खेळाडूंची झोपही पूर्ण होऊ शकली नाही. अंतिम वन डे सामना निर्णायक असल्याबद्दल हार्दिक म्हणाला, 'जर प्रामाणिकपणे सांगायचे तर कर्णधार म्हणून मला असे सामने हवे आहेत की जिथे काहीतरी रोमांच असेल. तो केवळ आंतरराष्ट्रीय सामना नसावा. आम्हाला माहित होते की आम्ही अपयशी ठरलो तर निराशा होईल. ज्या पद्धतीने मुलांनी येऊन त्यांचा खेळ दाखवला आणि खेळाचा आनंद लुटला, तेच मला संघात हवे आहे. दडपण कसे हाताळायचे, त्याचा आनंद कसा घ्यायचा, हे त्यांना कळले पाहिजे. दबावाचा सामना केल्याशिवाय तुम्ही हिरो बनू शकत नाही.'