Hardik Pandya Team India : भारतीय संघाने गेल्या १६ वर्षांपासून वेस्ट इंडिजच्या भूमीवर एकही वन-डे मालिका गमावलेली नाही. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली (IND vs WI) टीम इंडिया मालिकेत २-० ने आघाडीवर आहे. भारताचा सुपरस्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत एका स्टार खेळाडूने अतिशय तुफानी खेळ दाखवला आहे. पण हार्दिक पांड्याचे भारताच्या वन डे संघात पुनरागमन झाल्यामुळे 'या' मराठमोळ्या (Marathi Cricketer) स्टार खेळाडूचं करियर टांगणीला लागू शकतं अशी चर्चा आहे.
या मराठमोळ्या खेळाडूच्या करियवर टांगती तलवार
वेस्ट इंडिजविरुद्ध हार्दिक पांड्याच्या जागी शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) संघात स्थान देण्यात आले आणि त्याने आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली. तो टीम इंडियासाठी सर्वात मोठा मॅचविनर म्हणून वेळोवेळी उदयास आला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात शार्दुल ठाकूरने २ विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या वन डे सामन्यात त्याने ८ पेक्षा कमीच्या इकॉनॉमीने ५४ धावा देत ३ बळी टिपले. शार्दुल ठाकूर चांगल्या फॉर्मात आहे. कर्णधारासाठी तो 'विकेट-टेकिंग' गोलंदाज आहे. शार्दुल देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळतो. पण हार्दिक पांड्या वन डे संघात परतल्यावर या खेळाडूचा पत्ता कट होण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
शार्दुल ठाकूर भारताकडून तिन्ही फॉरमॅट चांगली कामगिरी केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली त्याने भारतीय संघाकडून पदार्पण केले. त्याने टीम इंडियासाठी ८ टेस्ट मॅचमध्ये २७ बळी, १९ वन डे सामन्यात २५ बळी तर २५ टी२० मॅचमध्ये ३३ बळी टिपले आहेत. तो सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता राखतो हे अनेक सामन्यांमध्ये दिसून आले आहे. पण असे असले तरी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याचा नंबर सध्या तरी हार्दिक पांड्याच्या खाली येतो, त्यामुळे संघ निवडताना हार्दिकला पहिली पसंती मिळण्याची शक्यता जास्त आहे. तशातच, हार्दिक मोठ्या विश्रांतीनंतर संघात परतला असल्याने तो पुढील ३ वर्षे चांगला खेळ करून दाखवण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल यात वादच नाही. अशा परिस्थितीत शार्दुलला चांगला खेळ करूनही आपल्या संधीची वाट पाहावी लागू शकते.