Join us  

Suryakumar Yadav, Hardik Pandya, IND vs NZ: हार्दिक पांड्या-सूर्यकुमार यादवमध्ये मतभेद? दोघांच्या विधानावरून रंगल्या वेगळ्याच चर्चा

भारत-न्यूझीलंड मालिका १-१ बरोबरीत, आज निर्णायक सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 9:12 AM

Open in App

Suryakumar Yadav, Hardik Pandya, IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसरा टी२० सामना आज अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेतील खेळपट्टीबाबत आतापर्यंत बरेच वाद झाले आहेत. विशेषत: लखनौच्या खेळपट्टीबाबतच्या वादामुळे तणाव आणखी वाढला आहे. त्यात आता टीम इंडियाचा उपकर्णधार सूर्यकुमार यादवने या वादावर आपले मत व्यक्त केले आहे.

"लखनौ सामन्यानंतर आम्ही (संघ) खेळपट्टीबद्दल बोललो, आम्ही ठरवले की भविष्यात जी काही खेळपट्टी मिळेल त्यावर आम्ही खेळू आणि तक्रार करणार नाही. तुम्ही कोणत्या खेळपट्टीवर खेळत आहात याने काही फरक पडत नाही. आम्ही या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणूनच आम्ही आमच्या नियंत्रणात होते ते प्रयत्न केले. परिस्थितीनुसार खेळ खेळावा लागेल आणि प्रयत्न करावा लागेल," असे अहमदाबाद सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव म्हणाला.

सूर्यकुमार यादवचे हे विधान कर्णधार हार्दिक पंड्याच्या विधानापेक्षा खूप वेगळे आहे. हार्दिक पांड्याने लखनौची खेळपट्टी टी२० साठी योग्य नसल्याचे म्हटले होते आणि त्यावर बरीच टीका केली होती. हार्दिकच्या टीकेनंतरच लखनौच्या पिच क्युरेटरला हटवण्यात आले. लखनौ येथे झालेल्या टी२० सामन्यात न्यूझीलंड संघाला केवळ ९९ धावाच करता आल्या, प्रत्युत्तरात भारताने मोठ्या संघर्षानंतर ४ गडी गमावून १०० धावा केल्या. या सामन्यात सूर्यकुमार यादवने २६ धावांची खेळी केली. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. केवळ टीम इंडियाच नाही तर चाहते आणि तज्ज्ञांनीही लखनौच्या खेळपट्टीवर टीका करत ती टी२० क्रिकेटसाठी योग्य नसल्याचे म्हटले होते.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडसूर्यकुमार अशोक यादवहार्दिक पांड्या
Open in App