Hardik Pandya, IPL Final 2022 GT vs RR: यंदाच्या हंगामात आज गुजरात टायटन्सचा संघ राजस्थान रॉयल्सशी विजेतेपदासाठी भिडणार आहे. गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्याच हंगामात फायनलपर्यंत मजल मारली आहे. राजस्थानने २००८च्या विजेतेपदानंतर १४ वर्षांनी फायनल गाठली आहे, पण त्यांचीही यंदाची कामगिरी अतिशय उत्तम आहे. त्यामुळे यंदा कोणता संघ बाजी मारणार याकडे सर्वच चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. गुजरातने क्वालिफायर-१ मध्ये राजस्थानला पराभूत केले होते. त्या सामन्यात डेव्हिड मिलर मॅचविनर ठरला होता. पण कर्णधार हार्दिक पांड्यानेही नाबाद फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला होता. याच हार्दिक पांड्याचा IPL फायनलमधील एक रेकॉर्ड वाचून राजस्थानच्या खेळाडूंना आणि चाहत्यांना नक्कीच घाम फुटेल.
गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आज पहिल्यांदाच IPL फायनलमध्ये संघाचे नेतृत्व करत आहे. पण IPL फायनल खेळण्याची त्याची ही पहिली वेळ नाही. २०११ साली जेव्हापासून हार्दिक पांड्या मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करत आहे, तेव्हापासून हार्दिक ज्या-ज्या फायनल्स खेळला, त्यापैकी एकही सामना त्याचा संघ (मुंबई इंडियन्स) हरला नाही. याचाच अर्थ हार्दिक पांड्याने आतापर्यंत जितके IPL चे अंतिम सामने खेळले, त्यात त्याचा संघ कधीच पराभूत झालेला नाही. त्याचा हा रेकॉर्ड आजही कायम ठेवण्यासाठी गुजरातचा संघ नक्कीच प्रयत्न करेल.
दरम्यान, आजचा सामना नेहमीप्रमाणे ७.३० वाजता सुरू न होता, ८ वाजता सुरू होणार आहे. त्याआधी सुमारे तासभर समारोप सोहळा रंगणार असून त्यात बडे बॉलिवूड सितारे सहभागी होणार आहेत. त्यानंतर सामना रात्री आठ वाजता सुरू होईल. जर खराब हवामानमुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला, तर नियमानुसार कमीत कमी ५-५ षटकांचा सामना होईल. सामना होऊच शकला नाही, तर राखीव दिवस असलेल्या उद्याच्या दिवशी फायनल रंगेल. सामना सुरू असताना थांबवाव लागला तर उद्या तिथूनच पुढे सामना सुरू होईल. याशिवाय, काही कारणाने सामना झालाच नाही तर मात्र गुणतालिकेतील अव्वल संघाला विजेता घोषित केलं जाईल.