Join us

Hardik Pandya Tilak Varma, ICC T20 Rankings: हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश

Hardik Pandya Tilak Varma, ICC T20I Rankings: हार्दिक आणि तिलकसह संजू सॅमसनलाही क्रमवारीत मिळाली बढती, सुर्याची मात्र घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 15:15 IST

Open in App

Hardik Pandya Tilak Varma, ICC T20I Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) ताज्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. भारताचा अनुभवी खेळाडू हार्दिक पंड्याने जगातील T20 आंतरराष्ट्रीय अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. तर तिलक वर्माने ICC T20I क्रमवारीत फलंदाजांच्या TOP 10 यादीत मोठी झेप घेतली. त्याने चक्क ६९ स्थानांची झेप घेत TOP 3 मध्ये जागा मिळवली. भारताच्या दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या मालिकेदरम्यान पांड्या आणि तिलक वर्मा या दोघांनी चमकदार खेळी करून ही कामगिरी केली.

हार्दिक पांड्या नंबर १

हार्दिक पांड्याने इंग्लंडच्या लियम लिव्हिंगस्टन आणि नेपाळच्या दीपेंद्रसिंग अरी यांना मागे टाकत T20I अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. पांड्याने टी२० अष्टपैलूंच्या क्रमवारीत दुसऱ्यांदा अव्वल क्रमांक गाठला. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या हार्दिकने पांड्याने या आधी टी२० विश्वविजेतेपदानंतर अव्वलस्थान मिळवले होते. दक्षिण आफ्रिकेसोबतच्या चार सामन्यांच्या मालिकेदरम्यान, पांड्याने दुसऱ्या सामन्यात नाबाद ३९ धावांची खेळी केली होती. त्यामुळे भारताचा डाव सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला होता. त्यानंतर चौथ्या निर्णायक सामन्यात, पांड्याने तीन षटकांत ८ धावा देत १ गडी मिळवल्याने भारतीय संघाने मालिका ३-१ ने जिंकली.

तिलक वर्माचा TOP 3 मध्ये

भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेतील सामनावीर ठरलेल्या तिलक वर्माने दोन शतके आणि २८० धावा केल्या. यासह त्याने फलंदाजीच्या क्रमवारीत ६९ स्थानांची झेप घेतली. या झेपेसह तिलक वर्मा थेट तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवची एका स्थानाने घसरण होऊन तो चौथ्या स्थानी गेला. तर संजू सॅमसननेही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दोन शतके झळकावली होती. तो १७ स्थानांच्या झेपेसह २२ व्या स्थानी विराजमान झाला. दक्षिण आफ्रिकेचा ट्रिस्टन स्टब्स ३ स्थानांच्या बढतीसह २३ व्या स्थानी तर हेनरिक क्लासेन ६ स्थानांच्या बढतीसह ५९ व्या स्थानावर पोहोचला आहे.

टॅग्स :आयसीसीहार्दिक पांड्यातिलक वर्मासंजू सॅमसनसूर्यकुमार अशोक यादव