Hardik Pandya vs Jadeja, IPL 2022: भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज खेळाडू हार्दिक पांड्या बरेच महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर होता. IPL 2022 मध्ये त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. सुरूवातीच्या सामन्यांमध्ये हार्दिकने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्यासोबतच सामन्यात वेगवान गोलंदाजीही केली. त्यामुळे हार्दिक पांड्या पूर्णपणे फिट असल्याची साऱ्यांनाच खात्री पटली होती. तशातच एका सामन्यात तो संघाबाहेर बसला. तेव्हापासून गेल्या सहा सामन्यांत त्याने केवळ एकच षटक टाकले आहे. त्यामुळे हार्दिक सध्याच्या घडीला गोलंदाजीसाठी फिट आहे की नाही, यावरून मतमतांतरे आहेत. तशातच भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जाडेजा याने हार्दिक पांड्याबद्दल रोखठोक मत व्यक्त केलं.
"हार्दिक पांड्या हा चांगला क्रिकेटपटू आहे. पण सध्या तो जे काही करतोय, त्याला सर्वस्वी तोच जबाबदार आहे. तो दुखापतग्रस्त होता, त्यानंतर त्याने दमदार पुनरागमन केलं यात वादच नाही. त्याने सुमारे ताशी १४० किमीच्या वेगाने गोलंदाजी केल्याचेही दिसून आले. टीम इंडियामध्ये त्याच्याकडून ज्या वेगाची अपेक्षा होती, त्यापेक्षा १४०+ हा जास्तच वेग होता. पण त्याने जोशात तसं केलं. याचाच अर्थ मला असं वाटतं की हार्दिक पांड्याने शो-ऑफ केला. तो काय करू शकतो हे तो दाखवायला गेला. त्याला त्याच्या टीकाकारांना शांत करायचं होतं. त्या प्रयत्नात त्याने अपेक्षेपेक्षा जास्त परिश्रम घेतले आणि त्याचा फटका त्याला काही सामन्यांनंतर बसला", असं मत जाडेजाने व्यक्त केले.
हार्दिक पांड्याने अतिपरिश्रम घेतले. त्याने स्वत:च्या शरिराला गरजेपेक्षा जास्त ताण दिला. त्यामुळे आता अशी परिस्थिती ओढवली आहे की त्याला गोलंदाजीसाठी नीट धावताही येत नाहीये. त्याच्यासाठी हा एक धडा आहे आणि त्याने तो आयुष्यभर लक्षात ठेवायला हवा. क्रिकेटपटूला आपल्या मर्यांदांचा अंदाज हळूहळू येतो. त्यामुळे कोणीही आपल्या शरीरावर गरजेपेक्षा जास्त ताण देऊ नये. हार्दिकने जे केलं त्यातून त्याची अपरिपक्वता दिसून आली", असंही जाडेजा म्हणाला.