Hardik Pandya Injury : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बंगळुरूच्या NCA मधून मुंबईत दाखल झाल्याने चाहते सुखावले होते. पण, इतक्यात आनंदी होऊ नका कारण हार्दिक गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या लढतीतही खेळणार नसल्याचे वृत्त समोर येतेय. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याचा पाय मुरगळला होता आणि ३ चेंडू टाकून तो माघारी परतला होता. तो अजूनही त्यातून पूर्णपणे बरा झालेला नाही. भारताला पुढील दोन सामन्यांत श्रीलंका ( २ नोव्हेंबर) आणि दक्षिण आफ्रिका ( ५ नोव्हेंबर) यांचा सामना करायचा आहे आणि या दोन्ही सामन्यांत हार्दिकची खेळण्याची शक्यता मावळली आहे. तो कदाचित साखळी सामन्यातील शेवटच्या नेदरलँड्सविरुद्धच्या ( १२ नोव्हेंबर) लढतीत खेळण्याची शक्यता सध्यातरी वर्तवली जात आहे.
सेमी फायनलची चुरस; भारताला हवाय १ विजय, तर पाकिस्तानची झालीय कोंडी; नेदरलँड्सलाही संधी
पुण्यात १९ ऑक्टोबरला झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक गोलंदाजी करताना जखमी झाला. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघ न्यूझीलंड व इंग्लंडविरुद्ध खेळला.''त्याची दुखापत गंभीर नाही. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होतेय आणि तो साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात परतण्याचा अंदाज आहे. तो कदाचित थेट उपांत्य फेरीत खेळू शकतो,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ हा अपराजित असलेला एकमेव संघ आहे आणि त्यांनी ६ पैकी ६ सामने जिंकले आहेत. हार्दिकच्या दुखापतीमुळे भारतीय संघाला प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करावे लागले. त्यांना स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून मोहम्मद शमीला आणि मधल्या फळीसाठी सूर्यकुमार यादवला संधी द्यावी लागली. शमीने त्याला मिळालेल्या संधीचं सोनं करताना दोन सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या. पण, हार्दिक परतल्यास शमीला बाहेर बसावे लागू शकते.