Hardik Pandya Injury Updates : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाची गाडी सूसाट पळत असताना दुखापतीने त्यांना घेरले. हार्दिक पांड्याला बांगलादेशविरुद्धच्या लढतीत दुखापत झाली आणि त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीला मुकावे लागले. आता इंग्लंडविरुद्धच्या लढतीत त्याच्या खेळण्याची शक्यता कमी असल्याचे अपडेट्स समोर येत आहेत. लखनौ येथे २९ ऑक्टोबरला हा सामना होणार असला तरी पांड्या दुखापतीतून पूर्णपणे बरा होण्याची शक्यता नसल्याचे संकेत मिळत आहेत.
पुण्यात बांगालदेशविरुद्धच्या लढतीत पांड्याचा पाय मुरगळला होता आणि त्यानंतर त्याने मैदान सोडले. तो नंतर खेळायला आलाच नाही आणि दुसऱ्या दिवशी बंगळुरू येथील NCA मध्ये उपचारासाठी गेला. त्यामुळे त्याला धर्मशाला येथील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळता आळे नाही. हार्दिकची दुखापत गंभीर नाही, परंतु संघ् व्यवस्थापन त्याच्याबाबत घाई करू इच्छीत नाही. ''हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्ध लखनौ येथे होणाऱ्या सामन्यातही खेळणार नाही. त्याची दुखापत गंभीर नाही, परंतु खबरदारी म्हणून त्याला खेळवण्याची घाई केली जाणार नाही,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने क्रिकेटनेक्स्टला सांगितले.
३० वर्षीय हार्दिक संघासोबत धर्मशालाला नव्हता गेला. वैद्यकिय टीमने त्याला विश्रांती घेण्यास सांगितले होते आणि तो मुंबईत श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या लढतीपूर्वी संघासोबत दिसण्याची शक्यता कमीच आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत हार्दिकच्या गैरहजेरीत सूर्यकुमार यादवला संधी मिळाली, पंरतु रन आऊट झाल्याने त्याला मोठी खेळी करता नव्हती आली.