Hardik Pandya Reacts To Criticism : भारतीय संघाला २०२१च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. पाकिस्तान व न्यूझीलंड यांनी अगदी सहज टीम इंडियाला पराभूत केले. या स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या ( Hardik pandya) निवडीवरून बराच वाद रंगला. हार्दिक गोलंदाजी करण्यासाठी पुर्णपणे तंदुरूस्त नव्हता, तरीही त्याची निवड केली गेली. भारताच्या पराभवानंतर हार्दिकवर प्रचंड टीका केली गेली. त्यावर हार्दिकनं अखेर मौन सोडले. आपल्याला बळीचा बकरा केलं, असे वादग्रस्त विधान हार्दिकनं केलं आहे.
बोरिया मजूमदार यांच्या कार्यक्रमात हार्दिक पांड्या बोलत होता. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आपली निवड फलंदाज म्हणून केली गेली असल्याच धक्कादायक खुलासा त्यानं केला. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी हार्दिकची निवड अष्टपैलू खेळाडू म्हणून केल्याचा दावा केला होता. तो प्रत्येक सामन्यात चार षटकं फेकेल, असंही ते म्हणाले होते. पण, हार्दिकनं चेतन शर्मा यांचा दावा खोडून काढला. विराट कोहलीनंतर आता हार्दिकनं निवड समितीला फैलावर घेतले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराटनं धक्कादायक दावा करताना सौरव गांगुलीला खोटारडे ठरवले होते.
हार्दिक म्हणाला,''वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीचा संपूर्ण दोष मला दिला गेला. प्रत्येक जण माझ्यावरच दगड फेकत होता. मी गोलंदाजी केली नाही, हे खरं आहे. पण, माझी निवड एक फलंदाज म्हणून केली गेली होती. पहिल्या सामन्यात गोलंदाजी करण्यासाठी मी अथक परिश्रम घेतले, परंतु मी गोलंदाजी करू शकलो नाही. दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी केली, परंतु मला ती करायला नको हवी होती. मी संघासाठी गोलंदाजी केली. पण, त्याचा शेवट गोड झाला नाही.''
अफगाणिस्तान व न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात हार्दिकनं ४० धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. चेतन शर्माने , त्याची निवड अष्टपैलू म्हणून झाली होती. तो चार षटकांचा कोटा पूर्ण करेल, असा दावा केला होता. पण, हार्दिक पूर्णपणे तंदुरूस्त नाही. त्यानं काही सामन्यांत गोलंदाजी केली, परंतु त्यानं फार मदत मिळाली नाही.