नवी दिल्ली, दि. 31 - भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये दहा वर्षांपूर्वी स्टुअर्ट ब्रॉडला मारलेल्या सहा चेंडूत सहा षटकारांचा विक्रम मोडीत काढायची इच्छा असल्याचे अष्टपैलू हार्दिक पांड्याने व्यक्त केली आहे. बीसीसीआय डॉट टीव्हीच्या मुलाखतीत मजेशीर अंदाजात पंड्याने हा इच्छा व्यक्त केली.यावेळी बोलताना तो म्हणाला की, एका षटकांत सहा षटकार मारण्याचा अजून विचार केला नाही पण आता झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतमध्ये सलग तीन षटकार मारले आहेत. मात्र चौथा षटकार ठोकला नाही. कारण त्यावेळी तशी परिस्थिती नव्हती. जर कधी सहा चेंडूत सहा षटकार मारण्याची परिस्थिती आली, तर त्या दिवशी मी एका षटकात सहा षटकार मारेन.टी 20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये नियमीत सदस्य असलेल्या पांड्याने लंकेविरुद्ध कसोटीमध्ये पदार्पन केलं आहे. पहिल्याच कसोटी सामन्यात हार्दिक पांड्यानं फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चूणूक दाखवली. कसोटी पदार्पणातच पंड्याने अर्धशतक ठोकलं. यावेळी आपण कसोटीत नव्हे, तर वन डेत खेळल्यासारखी फलंदाजी करत होतो, असं पंड्या म्हणाला. पंड्याने श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत 49 चेंडूत 50 धावा केल्या. याच धावांच्या बळावर भारताने 600 धावांचा टप्पा पूर्ण केला होता.दरम्यान, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम सर गॅरी सोबर्स यांनी केला होता. भारताच्या रवी शास्त्रीने या पराक्रमाची पुनरावृत्ती केली होती. तर त्यानंतर युवराज सिंगने ब्रॉडच्या एकाच षटकात सहा षटकार लगावले होते. युवराजच्या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने फक्त बारा चेंडूत अर्धशतक फटकावले. केवळ ट्वेंटी ट्वेंटी नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे सर्वांत वेगवान अर्धशतक आहे.तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही ही कामगिरी यापूर्वी केवळ एकदाच झाली आहे. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या हर्षेल गिब्जने हॉलंडच्या डॉन वाजच्या एका षटकात सहा षटकार ठोकले आहेत. आत हार्दिक पांड्या या विक्रमाची पुनरावृत्ती करतो का हे पाहणे महत्वाचे ठरेल. पांड्याने जर एका षटकांत सहा षटकार लगावले तर अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय असेल.
- मॅगी खाऊन दिवस काढायचो -
भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या उद्देशाने मी भरपूर मेहनत करत होतो. अंडर -19 क्रिकेट खेळताना फक्त मॅगी खाऊन दिवस काढत होतो, असा खुलासा हार्दिक पांड्याने केला आहे. मला मॅगी खूप आवडायची आणि माझी आर्थिक परिस्थिती त्यावेळी खराब होती. त्यामुळे मैदानात फिट राहण्यासाठी मला मॅगीवर दिवस काढावे लागत होतो. क्रिकेट खेळण्याआधी म्हणजे सकाळी मी मॅगी खात होतो. त्यानंतर संध्याकाळी क्रिकेट खेळून आल्यावर पुन्हा मॅगीवर भूक भागवत होतो. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे मला हवे ते मी खाऊ शकतो, असे हार्दिक पांड्या याने एका टिव्ही शोदरम्यान सांगितले. यापुढे तो म्हणला की, मी आणि माझा भाऊ कुणाल क्रिकेट खेळण्यासाठी वेगवेगळ्या गावी जात होते. त्यावेळी प्रत्येक सामन्यासाठी आम्हाला पैसे मिळत होते. प्रत्येक सामन्यासाठी कुणालला 500 रुपये, तर मला 400 रुपये मिळायचे. ही परिस्थिती आयपीएलमध्ये निवड होण्याआधी सहा महिन्यांपर्यंत चालू होती. मात्र आयपीएलनंतर बदलली. त्यामुळे आज आम्ही हवे ते खाऊ शकतो आणि हवे तसे जगू शकत असल्याचेही यावेळी हार्दिक पांड्या म्हणाला.