Hardik Pandya Team India: भारताचा धडाकेबाज फलंदाज हार्दिक पांड्या गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून थोडा दूर आहे. टी२० विश्वचषक २०२० मध्ये त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्यानंतर मालिकेत त्याला संघात स्थान मिळालं नाही आणि मग त्याने क्रिकेटमधून थोड्या कालावधीसाठी ब्रेक घेतला. आता हार्दिक पुनरागमनाच्या तयारीत आहे. नुकतेच त्याने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं. 'मी गाजावाजा न करता व्यायाम आणि क्रिकेटचा सराव करतोय. टी२० विश्वचषक भारताला जिंकवून देणं हे माझं स्वप्न आहे', अशा भावना त्याने मुलाखतीत व्यक्त केल्या. त्यावरून त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
'टी२० विश्वचषक जिंकवून देण्याची स्वप्न पाहणाऱ्या हार्दिक पांड्याला खूपच आत्मविश्वास आहे. पण आधी संघात स्थान मिळवून दाखव', अशी खोचक टिपण्णी एका फॅनने केली. तर 'टी२० विश्वचषक जिंकवून देण्यासाठी त्या संघात असावं लागतं', असं दुसऱ्या एका फॅनने लिहिलं. एका फॅनने तर, 'हार्दिकला फारच आत्मविश्वास आहे की तो संघात सिलेक्ट होणार', असं म्हणत त्याला ट्रोल केलं आहे. पाहूया ट्रोल करणारी काही निवडक ट्वीट्स-
--
--
--
हार्दिक पांड्या नक्की काय म्हणाला?
"सध्या माझ्या समोर एकच ध्येय आहे ते म्हणजे टी२० विश्वचषकापर्यंत पुन्हा तुफान फॉर्मात यायचं. माझं आताचं ट्रेनिंग आणि सराव सारं काही विश्वचषक स्पर्धा डोक्यात ठेवूनच सुरू आहे. मला संघाला वर्ल्ड कप जिंकवून द्यायचाय. मी जर ते करू शकलो तर मला खरंच त्या गोष्टीचा आनंद वाटेल आणि अभिमानही वाटेल. माझ्या मनातील वर्ल्ड कप जिंकण्याची इच्छा खूपच तीव्र आहे. वर्ल्ड कपच्या तयारीसाठी IPL चा मला खूपच चांगला उपयोग होईल. पण शेवटी भारतासाठी खेळणं आणि वर्ल्ड कपमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणं याचा आनंद वेगळाच असेल", असं हार्दिकने मुलाखती दरम्यान म्हटलं होतं.
हार्दिक पांड्याच्या या आत्मविश्वासामुळे तो जरी ट्रोल झाला असला तरी आता त्याला या ट्रोलर्सना खेळातून उत्तर देण्याचं आव्हान असणार आहे.