Hardik Pandya, IND vs IRE T20: टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धचे सामने संपल्यानंतर भारताला तीन टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी आयर्लंडला जावे लागणार आहे. भारतीय संघाला पाच दिवसांत आयर्लंडविरुद्ध तीन टी२० सामने (१८, २० आणि २३ ऑगस्ट) खेळायचे आहेत. हे तिन्ही सामने डब्लिन येथे होणार आहेत. आयर्लंड दौऱ्याबाबत सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार, एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयर्लंड दौऱ्यावर BCCI युवा खेळाडूंचा संघ पाठवू शकतो. तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यां दोघांना या दौऱ्यासाठी विश्रांती मिळू शकते, जेणेकरून वर्ल्ड कप आणि आशिया कप साठी त्यांच्यावर ताण येणार नाही. अशा परिस्थितीत हार्दिकऐवजी एका खास खेळाडूचं नाव कर्णधारपदासाठी चर्चेत आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'अद्याप काहीही ठरलेले नाही आणि वन डे व टी२० नंतर हार्दिकला कसे वाटते यावर ते अवलंबून असेल. यामध्ये भरपूर प्रवास असेल आणि फ्लोरिडा ते डब्लिन प्रवास करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागतो. हार्दिक पंड्या हा भारताच्या एकदिवसीय संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि अष्टपैलू खेळाडू असल्याने संघाला संतुलित चमू मिळतो. संघ व्यवस्थापन आणि राष्ट्रीय निवड समितीने त्याच्याबाबत काळजी घ्यावी असे वाटते. वन डे विश्वचषकाच्या दृष्टीने वर्कलोड मॅनेजमेंट खूप महत्त्वाचे आहे. विश्वचषक स्पर्धेत तो संघाचा उपकर्णधारही असणार आहे. अशा वेळी त्याला विश्रांती दिली जाऊ शकते आणि त्याच्याजागी सूर्यकुमारला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते.
सूर्यकुमारला मिळू शकते टी२० संघाच्या नेतृत्वाची संधी
हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला टी२० संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. सूर्यकुमार यादव विंडीज विरुद्धच्या टी२० मालिकेत टीम इंडियाचा उपकर्णधारही असणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना आयर्लंड दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात येणार आहे. त्यासोबतच जर हार्दिकला देखील विश्रांती देण्यात आली तर सूर्यालाच नेतृत्वाची संधी दिली जाऊ शकते.