Hardik Pandya Ashish Nehra, IPL 2022 GJ vs LSG Live: गेल्या काही महिन्यांपासून भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची गोलंदाजी हा भारतीय क्रिकेटसाठी चिंतेचा विषय बनला आहे. या कारणावरून त्याला टीकेलाही सामोरे जावे लागले आहे. तथापि, हार्दिकने असे संकेत दिले होते की तो IPL 2022 मध्ये त्याच्या नवीन संघ गुजरात टायटन्ससाठी (Gujarat Titans) गोलंदाजी करताना दिसणार आहे. या लीगमध्ये पांड्या गोलंदाजी करणार की नाही याकडेही संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. गुजरात संघाचा मार्गदर्शक आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने पांड्याच्या गोलंदाजीबाबत एक भन्नाट आणि गोंधळात टाकणारं विधान केलं.
कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा फिनिशर म्हणून व्यंकटेश अय्यरला तयार करत असल्याने पांड्याचे टीम इंडियातील स्थान धोक्यात आले आहे. व्यंकटेश अय्यर या खेळाडूने गेल्या काही सामन्यांमध्ये हे सिद्ध केले आहे की तो क्रमवारीत कोणत्याही स्थानी फलंदाजी करून वेगाने धावा करू शकतो. त्यातच अय्यर गोलंदाजीदेखील करतो. त्यामुळे हार्दिक सध्या जास्तच चिंतेत आहे. अशा परिस्थितीत तो गुजरात संघाकडून अष्टपैलू कामगिरी करूनच टीम इंडियात कमबॅक करू शकतो. त्यामुळे तो गोलंदाजी करणार का, याकडे साऱ्यांकडे लक्ष आहे. याबाबतच नेहराने उत्तर दिलं.
"जेव्हा मी त्याला बडोद्यात पाहिलं तेव्हा हार्दिक ८० टक्क्यांपर्यंत गोलंदाजी करत होता. ही काही आठवड्यांपूर्वीची गोष्ट आहे आणि तो खूप सहज गोलंदाजी करत होता. त्यानंतर तो NCA मध्ये गेला. आणि तेव्हापासून तो तिथे सतत सराव करत आहे. मी पहिल्या दिवसापासून म्हणत आहे की कोणत्याही टी-२० संघात मी पांड्याला पूर्ण फलंदाज म्हणून घेईन. बाकी मी त्याच्याकडे कर्णधार आणि फलंदाज म्हणून पाहतोय. त्यामुळे कदाचित त्याची गोलंदाजी सरप्राईज असू शकतं", असं बुचकळ्यात टाकणारं उत्तर नेहराने दिलं.