Join us  

हार्दिक पांड्याच करणार MI नेतृत्व; रोहित शर्माकडे पुन्हा नेतृत्व येण्याच्या चर्चांना विराम

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसह आयपीएलमध्येही खेळताना दिसणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 9:32 AM

Open in App

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :हार्दिक पांड्या सध्या दुखापतीतून सावरत असून आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिका तसेच आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही, अशी चर्चा रंगली होती. यामुळे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व पुन्हा एकदा रोहित शर्माकडे येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक सध्या तंदुरुस्त झाला असून तो अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसह आयपीएलमध्येही खेळताना दिसणार आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक भारत-अफगाणिस्तान यांच्यात जानेवारी पासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत खेळू शकतो. यासोबतच तो आयपीएल २०२४ मध्येही खेळणार आहे. विश्वचषक स्पर्धेदरम्यान टाच दुखावल्याने हार्दिक क्रिकेटपासून दूर झाला होता. 

अशातच तो आगामी आयपीएलही खेळू शकणार नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. यामुळे मुंबई इंडियन्सच्या चिंतेत भर पडली होती. मात्र, आता हार्दिक दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून तो दररोज सराव करत आहे. तसेच, त्याने पूर्ण तंदुरुस्ती मिळविल्याची माहितीही मिळाली आहे. त्यामुळे हार्दिक खेळणार की नाही मुंबईचे नेतृत्व कोण करणार? या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 

त्या चर्चा निरर्थक!

भारतीय संघाला ११ जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. या मालिकेआधी हार्दिक आपली पूर्ण तंदुरुस्ती सिद्ध करून दाखवेल. यासह तो या मालिकेत नेतृत्व करतानाही दिसेल. यानंतर रंगणाऱ्या आयपीएलमध्येही तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून सहभागी होईल. एका सूत्राने सांगितले की, हार्दिक आयपीएल खेळणार नसल्याच्या चर्चा निरर्थक आहेत. आयपीएलसाठी अद्याप चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे हार्दिकच्या सहभागाबाबत केवळ अंदाज व्यक्त होत आहेत.

 

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सहार्दिक पांड्यारोहित शर्मा