हार्दिक पांड्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याचे नेतृत्व कौशल्य सिद्ध केले आहे. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला पहिल्याच प्रयत्नात हार्दिकने जेतेपद पटकावून दिले आणि रोहित शर्मानंतर भारताचा कर्णधार म्हणून हार्दिककडे पाहिले गेले. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर हार्दिककडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाईल अशी चर्चा रंगतेय. दरम्यान, सध्या त्याच्याकडे ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद दिले गेले आहे आणि २०२४च्या वर्ल्ड कप तयारीची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे. पण, नुकत्याच विंडीज दौऱ्यावर भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे हार्दिक पांड्याचे वर्ल्ड कप स्पर्धेतील उप कर्णधारपद धोक्यात आले आहे आणि बीसीसीआयनेच त्याच्या स्पर्धकाचे नाव सांगितले आहे.
जानेवारी २०२३ मध्ये हार्दिककडे वन डे संघाच्या उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली. न्यूझीलंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याने उप कर्णधारपद भूषविले. विंडीज दौऱ्यावर रोहितने विश्रांती घेतल्यामुळे हार्दिकने दोन सामन्यांत नेतृत्वही केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली, परंतु त्यानंतर ट्वेंटी-२० मालिका गमावली. १७ वर्षानंतर वेस्ट इंडिजकडून भारताला मालिकेत पराभव पत्करावा लागला. पाच सामन्यांच्या मालिकेत ३-२ अशी हार झाल्यानंतर हार्दिकवर टीका झाली. त्याच्या रणनीतीवर आक्षेप घेतला गेला. आता आशिया चषक आणि वर्ल्ड कप तोंडावर आहे आणि अशात हार्दिककडून उप कर्णधारपदाची जबाबदारी जाण्याचे वृत्त समोर येतेय.
पीटीआयला बीसीसीआयच्या सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की,जसप्रीत बुमराह हा वन डे संघाच्या उप कर्णधारपदासाठी हार्दिकला आव्हान देऊ शकतो. तो सीनियर सदस्य आहे आणि हार्दिकच्या आधीच बुमराह भारतीय संघाचा कर्णधार बनला ( वि. इंग्लंड, कसोटी मॅच) होता. दक्षिण आफ्रिका ( २०२२) दौऱ्यावर तो वन डे संघाचा उप कर्णधार होता. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेत तो संघाचा उप कर्णधार बनू शकतो.
२१ ऑगस्टला आशिया चषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघाची घोषणा निवड समिती प्रमुख अजित आगरकर करणार आहे. यावेळी रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हेही उपस्थित असणार आहेत.