आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळू शकतील... काही सिनीयर खेळाडू एकतर निवृत्ती घेतील किंवा कसोटी व वन डे खेळण्यासाठी ट्वेंटी-२० फॉरमॅटपासून स्वतःला दूर करतील. अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ निवड करताना बरीच चर्चा, वावड्या उठल्या... वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दुखापतीमुळे बाहेर पडलेला हार्दिक पांड्या थेट आयपीएल २०२४ मध्ये आला आणि त्याच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघातील निवडीसाठी BCCI च्या बड्या अधिकाऱ्याने जोर लावल्याचे वृत्त आता समोर येत आहे.
रोहित शर्मा कदाचीत वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. त्याच्या निवृत्तीमुळेच हार्दिक पांड्याकडे ट्वेंटी-२० संघाचे उप कर्णधारपद सोपवले गेले आहे. रोहितने भारतासाठी अनेक ट्वेंटी-२० सामने गाजवले आहेत, परंतु त्याचा सध्याचा फॉर्म हा चिंतीत करणारा ठरतोय. आयपीएल २०२४ मध्ये रोहितचा फॉर्म मागील काही सामन्यांत हरवलेला दिसतोय. त्यात त्याचे वय लक्षात घेता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो ट्वेंटी-२० क्रिकेट खेळण्याची शक्यता कमी आहे.
दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात हार्दिक पांड्याला उप कर्णधार बनवण्याचा निर्णय बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या दबावामुळे घेतला गेला आहे. हार्दिकमध्ये ते भविष्याचा कर्णधार म्हणून पाहत आहेत. पण, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला त्याच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे अपयश आलेलं दिसतेय.
भारताचा वर्ल्ड कप संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), हार्दिक पांड्या ( उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह; राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद
भारतीय संघाचे वेळापत्रक
- ५ जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
- ९ जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
- १२ जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
- १५ जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा